जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथे चकमक; 5 दहशतवादी ठार

जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल येथे नियंत्रण रेषेवर (एलओसी) लष्कर-ए-तोयबाचे पाच दहशतवादी मारले गेले, अशी माहिती कश्मीर पोलिसांनी गुरुवारी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांविरोधातील शोध मोहीम सुरू आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.

चकमकीबद्दल माहिती देताना, कश्मीर पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केलं आहे की, ‘कुपवाडा एन्काउंटरअपडेट: लष्कर-ए-तोयबाचे आणखी 03 दहशतवादी ठार झाले (एकूण 05). या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. शोध मोहीम प्रगतीपथावर आहे. पुढील तपशील लवकरच येतील: एडीजीपी कश्मीर’.

देशातील लष्कराच्या चिनार कॉर्प्सने देखील ट्विटरवर वर एका पोस्टमध्ये चकमकीची माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ओपी कुपवारा: हिंदुस्थानचे लष्कर, जम्मू आणि कश्मीर पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी 26 ऑक्टोबर 23 रोजी सुरू केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये, घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ सतर्क जवानांनी हा प्रयत्न उधळून लावला. ऑपरेशन चालू आहे’.

गेल्या महिन्यात अशाच कारवाईत जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.