कोपरगाव नगरपालिकेचा अनागोंदी कारभार, पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्याची दाणादाण

पहिल्याच पावसाने कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. लोकांची ही त्रेधातिरपीट पाहून नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. शहर आणि तालुक्यात शनिवारी थोडा पाऊस झाला पण मंगळवारी दुपारी बऱ्यापैकी पावसाळा सुरू झाला. या वर्षीच्या पहिल्याच पावसाने शहरातील रस्ते व विविध प्रभागात जागोजागी पाणी तुंबले गेले.

गोदाम गल्लीतील डॉ. नाईकवाडे यांच्या मागील गल्लीतील जीर्ण झालेली संरक्षक भिंत रस्त्यावर पडली. पाण्याने गटारी नाले तुंबली गेली. पडलेल्या पावसाने रस्त्यावर उडणारी माती दबली गेली. सखल भागात पाण्याची डबकी तयार झाली आहेत. सद्ध्या नगरपालिकेच्या वतीने कोपरगाव शहरात पाईप लाईनचे खड्ड्यांचं खोदकाम सुरू आहे. ते बुजवले परंतु जमीन भुसभुशीत झाल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडली.

कोपरगाव शहरातील बहुतांशी रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे अनेक पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत असेल दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडल्याने ते सडण्याची भीती निर्माण झाली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, काही खोल भागात पाणी साचले आहे. असं असलं तरी समाज मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी राजा आनंदला आहे.