अजित पवारांसह 9 आमदार अपात्र होणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी वेगळी वाट धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. रविवारी अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीने कायदेशीर पाऊल उचलत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवारांसह 9 सदस्यांना अपात्र घोषित करण्याची याचिका केली. या याचिकेवर आता नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी सकाळी माध्यमप्रतिनिधींना राहुल नार्वेकर यांना अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेबाबत प्रश्न विचारले. याला उत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केलेली आहे, ती मी वाचून घेईन. त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, अजित पवार यांच्याकडे किती आमदारांचे समर्थन आहे? त्यांनी काही पत्र दिले का? तुमच्याशी संपर्क साधला का? असा सवाल विचारला असता नार्वेकर यांनी अजित पवारांकडे किती आमदारांचे समर्थन आहे याबाबत आपल्याला माहिती नाही असे उत्तर दिले.

महाराष्ट्राच्या रक्तात लढणे लिहिलेले! रोहित पवारांनी काकांविरुद्ध थोपटले दंड, भाजपचा उल्लेख करत म्हणाले…

दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेताच सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार जितेंद्र आव्हान यांची नेमणूक केली. याबाबत विचारले असता नार्वेकर म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याची निवड केल्यानंतर त्याची दखल घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. हा अधिकार बजावत असताना विधानसभा अध्यक्षांना ज्या संविधानिक तरतुदी आहेत आणि विधानसभेचे जे नियम आहेत या सर्वांचे पालन करूनच निर्णय घ्यावा लागतो.