Mumbai crime news – मोबाईल चोरीप्रकरणी एकाला अटक

मोबाईल चोरीप्रकरणी एकाला शिवडी पोलिसांनी अटक केली. उस्मान खान असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 48 विविध कंपनीचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

शिवडीच्या दारूखाना रोड येथे तक्रारदार राहतात. गेल्या आठवडयात त्याने घराच्या शिडीजवळ मोबाईल ठेवला होता. काही वेळाने ते शिडीजवळ गेले. तेव्हा त्याना मोबाईल जागेवर दिसला नाही. मोबाईल चोरी झाल्याप्रकरणी त्याने शिवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक बाळूराव घोगरे याच्या पथकातील उपनिरीक्षक अविनाश मोरे, हर्षल देशमुख, शेख यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. दारूखाना परिसरात एकजण मोबाईलची विक्री करत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक दारूखाना येथे गेले. पोलिसांनी खानला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगेत तक्रारदार याचा चोरीचा मोबाईल होता. पोलिसांनी खानकडून 48 मोबाईल आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.