खरे सूत्रधार अजूनही मोकाट तपास का गुंडाळत आहात? हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात हायकोर्टाने सोमवारी पोलिसांना फैलावर घेतले. अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजून मोकाट आहेत. अभिषेक यांच्या पत्नीने त्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. मग आरोपींचा शोध घेण्याऐवजी तपास का गुंडाळताय? आरोपपत्र दाखल करण्यात घाई का केली? असे सवाल न्यायालयाने पोलिसांना केले. तसेच दोन आठवडय़ांत सखोल तपास करीत प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. योग्य तपास करण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करीत अभिषेक यांच्या पत्नी, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी फौजदारी रिट याचिका केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी तेजस्वी यांच्यातर्फे अॅड. वैभव महाडिक यांनी बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाची खंडपीठाने गंभीर दखल घेतली आणि तपासातील हलगर्जीपणाबद्दल पोलिसांचे कठोर शब्दांत कान उपटले. यावेळी सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी तपासाबाबत अधिक सूचना घेण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार वेळ देतानाच खंडपीठाने पोलिसांना हत्येच्या कटाचा तपास योग्य पद्धतीने करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दोन आठवडय़ांनी पुढील सुनावणी होणार आहे.

तेजस्वी यांच्यातर्फे युक्तिवाद

अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी-सूत्रधारांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केलेला नाही. त्यामुळे खरे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत, असे असताना पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केले, याकडे तेजस्वी घोसाळकर यांच्या वकिलांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.

पोलिसांना आदेश

या प्रकरणात सीडीआरसारखे पुरावे आहेत. त्यादृष्टीने सखोल तपास करीत इतर आरोपी, सूत्रधारांचा मागोवा घ्या. डीसीपींच्या नियंत्रणाखाली सर्व पडताळणी करून प्रगत अहवाल सादर करा. तपास योग्य दिशेने करण्यासाठी अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांच्या वकिलांचे सहकार्य घ्या, असे आदेश पोलिसांना देत न्यायालयाने सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली.

न्यायालयाचे फटकारे

– अभिषेक घोसाळकर यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गंभीर आहे. असे असतानाही या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने तपास केलेला दिसत नाही.
– तेजस्वी घोसाळकर यांनी सविस्तर तपशील देत तक्रार दिली होती, वेळोवेळी वरिष्ठांना पत्र लिहून काही शंका उपस्थित केल्या होत्या. संशयित आरोपींची नावेही दिली होती. मग पोलिसांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिक तपास का केला नाही?

– आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ असतो. मग पोलिसांनी मुख्य सूत्रधारांचा, इतर आरोपींचा शोध न घेताच आरोपपत्र कसे दाखल केले? आरोपपत्रासाठी एवढी घाई का?

राजकीय आश्रय असलेल्या आरोपींची पाठराखण

तेजस्वी यांनी याचिकेत अनेक गंभीर दावे केले आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटात अमरेंद्रकुमार मिश्रा, मेहुल पारेख, संजय आचार्य यांचा सहभाग असण्याबरोबरच अज्ञात सूत्रधार आहेत. त्या सूत्रधारांचा चेहरा वेळीच उजेडात आणण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. राजकीय आश्रय असलेल्या आरोपींची पोलिसांकडून जाणूनबुजून पाठराखण केली जात आहे, असा आरोप तेजस्वी यांनी याचिकेतून केला आहे.