मणिपूर जळते आहे… पंतप्रधानांनी निवेदन द्यावे! विरोधक आक्रमक; संसद ठप्प

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूर जातीय हिंसाचारात होरपळून निघत असताना दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत मणिपूरमध्ये धिंड काढल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्याने त्याचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्वाभाविकपणे उमटले. मणिपूर जळते आहे, मणिपूरवर चर्चा करा, पंतप्रधानांनी तातडीने निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी दोन्ही सभागृहांत केली. मात्र सरकारने त्याला कुठलाही प्रतिसाद न दिल्याने दोन्ही सभागृहांत झालेल्या प्रचंड गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विद्यमान सदस्य हरद्वार दुबे यांच्या निधनामुळे त्यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले, मात्र त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधकांनी एका सुरात मणिपूरवर सभागृहात तातडीने चर्चा घडवून आणावी आणि पंतप्रधानांनी तातडीने निवेदन द्यावे, अशी मागणी केली. मात्र सरकारच्या तशी कोणतीही तयारी नसल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिणामी कामकाज सुरुवातीला दुपारी 2 व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभेतही अधिवेशनाची सुरुवात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. या आजी- माजी सदस्यांच्या सन्मानार्थ सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी मणिपूरचा विषय उपस्थित केला. ‘मणिपूर… मणिपूर…’ अशी घोषणाबाजी करत या मुद्दय़ावर तातडीने सभागृहात चर्चा करा, अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली. सरकार मणिपूरविषयी चर्चा करण्यास तयार आहे, असे थातूरमातूर उत्तर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले, मात्र त्यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही.

पंतप्रधानांकडून सोनिया गांधींच्या तब्येतीची ख्यालीखुशाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वभावाच्या विपरीत आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या तब्येतीची ख्यालीखुशाली विचारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोनिया व राहुल गांधी प्रवास करत असलेल्या विमानाचे भोपाळमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर आज संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काही काळ लोकसभेत पंतप्रधानांनी सोनियांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आपकी तबियत कैसी है, अशी विचारणा केली. त्यावर सोनियांनी आय एम फाईन. थँक्यू, असे उत्तर दिले. एरवी विरोधी पक्षांशी कडवटपणे वागणाऱया पंतप्रधानांमध्ये असा अचानक बदल कसा झाला, याबद्दल आज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली.