जंगल’ बालगीताची बच्चे कंपनीत क्रेझ

अलीकडे वाचक बालसाहित्यापासून दूर जात आहेत. अशातच लहान मुलांसाठी ऍनिमेटेड फॉर्ममध्ये कविता सादर करून छोटय़ा दोस्तांना कवितेच्या विश्वात आकर्षित करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग कमालीचा यशस्वी होताना दिसत आहे.

‘समर्थ दृष्टी’ (Samarth Drishti Jangal) या यूटय़ुब चॅनेलवरून ‘जंगल’ हे बालगीत नुकतेच प्रकाशित झाले आहे. सुकुमार नितोरे यांनी लिहिलेल्या आणि सानेगुरुजी कथामाला, वरळीगाव यांनी प्रकाशित केलेल्या ‘किलबिलाट’ या बाल काव्यसंग्रहातील ही कविता आहे. ‘चालता चालता कधी एकदा चुकलो होतो वाट…’ असे या कवितेचे बोल आहेत. सुकुमार नितोरे यांनीच या कवितेला संगीत दिले आहे, तर श्रेया नितोरे हिने कविता सुंदर गायली आहे.

वाट चुकून एक मुलगा जंगलात पोहचतो आणि त्याची गाठ जंगलातील विविध प्राणी मित्रांशी पडते. तिथे ज्या गमतीजमती घडतात, त्याचे मजेशीर वर्णन या बालगीतात आहे. या गीताचं सुंदर ऍनिमेशन संदेश नितोरे यांनी, तसंच संकलन केलं आहे करण बजलोरा व सार्थ टेमकर यांनी. हे गीत छोटय़ा दोस्तांच्या आणि मोठय़ांच्याही चांगलेच पसंतीस उतरले आहे. या ‘जंगल’ बालगीताला आतापर्यंत एक लाखाहून अधिक ‘ह्यूज’ मिळाले आहेत.