‘शासन आपल्या दारी’ आयुक्त नाहीत कोल्हापुरी; शिवसेनेची महापालिकेसमोर तीव्र निदर्शने

कोल्हापूर शहरात सध्या साथीचे आजार थैमान घालत असून, रस्ते, पाणी, कचरा अशा मूलभूत समस्यांनी कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत. तरीसुद्धा गेल्या 25 दिवसांपासून महापालिकेला आयुक्त नियुक्त केला नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने आज महापालिकेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

दरम्यान ‘शासन आपल्या दारी आयुक्त नाहीत कोल्हापूरी, इकडून द्या..तिकडून द्या…टेबला खालून द्या..पण कोल्हापूर महापालिकेला आयुक्त द्या’ अशा चपराकात्मक घोषणा दिल्या. केवळ जाहिरातबाजीतून वेगवान निर्णय शासन गतिमान म्हणवणाऱया शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभाराचा यावेळी शिवसैनिकांकडून पंचनामाच करण्यात आला.

नोव्हेंबर 2019 मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी आतापर्यंत प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. पण ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांची बदली करण्यात आली. पण पाऊस लांबल्यामुळे शहरात पाणीटंचाई उद्भवली. यासोबतच कचरा उठाव ते चिकन गुनिया, डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार अशा आरोग्याच्या समस्यने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या 25 दिवसांपासून महापालिकेत कायमस्वरूपी प्रशासक नसल्यामुळे गलथान कारभार सुरू आहे. त्याचा फटका कोल्हापूरांना बसत आहे.

एकंदरीतच महापालिकेतील प्रशासकिय कारभार पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येत आहे. ‘गतिमान सरकार, निर्णय वेगवान’ ‘शासन आपल्या दारी’ या घोषणांपेक्षा शासनाने तातडीने प्रशासक देण्यासंदर्भात निर्णय घेऊन, येथील मूलभूत प्रश्न सोडवण्यासंदर्भात प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, राजू यादव, राजु सांगावकर, शशिकांत बिडकर, दत्ता टिपुगडे, विशाल देवकुळे, मंजित माने, शांताराम पाटील, युवराज खंडागळे, दीपक रेडकर, दीपक गौड, दिनेश साळोखे, किरण पडवळ, स्मिता सावंत, स्वरूपा खुरंदळे, प्रतिज्ञा उतुरे, दीपाली शिंदे, प्रीती क्षीरसागर, सुरेश कदम, विनोद खोत, अनिल पाटील, रणजित आयरेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कोटय़वधींच्या निविदाचे गौडबंगाल

 विविध विकासकामांच्या नावाखाली सध्या कोटय़वधी रूपयांचे आराखडे करण्यात येत आहेत. काही विकासकामांचे नियोजनही सुरु आहे. त्यामुळे कायमस्वरूपी प्रशासक तातडीने न देण्यामागे या महापालिकेतील विकास कामांसाठी निघालेल्या व निघणाऱया कोटय़वधींच्या निविदांचे कारण तर नाहीना, असा सवाल यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला.