माता न तू वैरिणी ! लिफ्टमध्ये दिला बाळाला जन्म, त्यानंतर केले भयंकर कृत्य

चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिने जे केले त्याची कल्पनाही करता येणार नाही. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

साऊथ वेस्ट चीनच्या चोंदकिंगमध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी महिला गेली होती. तिथे तिने एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर महिलेने स्वत:ला लागलेले आणि बाळाला लागलेले रक्त पुसून काढले. तसेच कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये यासाठी लिफ्टच्या जमिनीवर लागलेले रक्ताचे डागही टिश्यू पेपरने पुसण्याचा प्रयत्न केला.  हे सर्व केल्यानंतर तिने त्या नवजात बाळाला थेट कचराकुंडीत फेकले आणि त्याच्यावर टिश्यू पेपर पसरवले त्यामुळे कोणाला ते बाळ कचराकुंडीत असल्याचे दिसणार नाही.

ही घटना 21 ऑगस्ट रोजी रात्री 8.44 वाजताची आहे. ही महिला सुटकेस घेऊन लिफ्टमध्ये चढली होती. लिफ्टमध्ये चढल्यानंतर कोपऱ्यात वाकते आणि बाळाला जन्म देते. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला आपल्या हातांमध्ये घेते आणि टिश्यूने त्याचे शरीर स्वच्छ पुसते. बाळासोबत तिच्या शरीरावरही लागलेले रक्ताचे डाग ती स्वच्छ करते. रात्री जवळपास 8.47 जेव्हा लिफ्ट थांबते, तेव्हा महिला आपल्या बाळाला घेऊन धावत बाहेर पडते. त्यानंतर बाळाला लिफ्टच्या बाजुला असलेल्या कचराकुंडीत फेकले आणि त्याच्यावर टिश्यु पेपर टाकले. त्यानंतर ती महिला आपल्या शूजना लागलेले रक्त साफ करते आणि निघून जाते. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रहिवासी इमारतीत राहणारी काही लोकांची नजर कचऱ्यात फेकलेल्या बाळाकडे गेली. त्यानंतर त्यांनी बाळाला तत्काळ रुग्णालयात पोहोचवले. मुलाची हालत सध्या स्थिर आहे. असे बोलले जात आहे की, मुलाला त्याची आई रुग्णालयातून घेऊन गेली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि महिलेने असे का केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.