नागपूर – विकत घेतलेल्या लहान मुलीचा अनन्वित छळ, 5 दिवस शौचालयात कोंडून ठेवले

वडिलांनी पैशांसाठी विकून टाकलेल्या 10 वर्षांच्या मुलीच्या तोंडून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा उठला. एवढ्याशा वयात या मुलीने जे सहन केलं ते शब्दात सांगण्यापलिकडचं आहे. वडिलांनी विकून टाकल्यानंतर या मुलीला एका मुस्लिम जोडप्याने इमारतीमध्ये त्यांच्यासोबत आणून ठेवलं होतं. तह अरमान इश्तियाक अहमद खान आणि त्यांची पत्नी हीना हे दोघे या मुलीला घेऊन आले होते. या दोघांनी या मुलीला 5 दिवस शौचालयात कोंडून ठेवलं होतं. ते घरी नसल्याची संधी उचलत कशीबशी या मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली.

या मुलीला 4 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी विकले होते. जेव्हा तिला विकले तेव्हा ती अवघ्या 6 वर्षांची होती. या मुलीला खान आणि त्याच्या बायकोने बेसा-पिपला रोडवरील अथर्व नगरीमधल्या एका इमारतीत भाड्याच्या घरात आणून ठेवलं होतं. तिच्या छळाची कहाणी मंगळवारी जगासमोर आली. याला कारण ठरलं ते या भाड्याच्या घराचा खंडीत केलेला विद्युतपुरवठा. हा विद्युत पुरवठा का खंडीत केला हे कळू शकलेलं नाही, मात्र जेव्हा वीजपुरवठा बंद झाला तेव्हा या मुलीला ज्या शौचालयात कोंडलं होतं, त्या शौचालयात काळाकुट्ट अंधार झाला होता. या अंधारामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली होती. या मुलीने चमच्याच्या मदतीने कसंबसं शौचालयाचं दार उघडलं. यानंतर तिने खिडकी उघडत सुरक्षारक्षकाला मदतीसाठी आवाज दिला. त्याने या मुलीचा आवाज ऐकून इमारतीतील रहिवाशांना याबाबतची कल्पना दिली. रहिवाशांनी ही बाब पोलिसांना कळवली होती, पोलीस घटनास्थळी आले मात्र काहीही न करता निघून गेले असा आरोप शेजारच्यांनी केला आहे. शेजारच्यांनी या मुलीला घरातून बाहेर काढलं आणि तिला धीर देत पोलीस स्टेशन गाठलं होतं.

या मुलीने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की तिला खान आणि त्याची बायको घरकाम करायला लावायचेय चूक झाली तर तिला सिगारेटचे आणि गरम भांड्यांचे चटके द्यायचे. हिनाच्या भावाने या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले होते आणि तिला अनैसर्गिक संभोग करण्यासही भाग पाडले होते. या मुलीच्या अंगावर ठिकठिकाणी चटके दिल्याच्या जखमा दिसून आल्या आहेत. खान आणि त्याची बायको काही कामासाठी बंगळुरूला गेले होते, त्याचवेळी या मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली.