एका गुन्ह्यात पकडले, अन्य गुन्हेही उघड झाले; आरसीएफ पोलिसांची कारवाई

बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखाचा ऐवज चोरून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला आरसीएफ पोलिसांनी 24 तासांत गजाआड केले. विशेष म्हणजे या गुह्यातील सर्व ऐवज हस्तगत करण्याबरोबर पोलिसांनी त्याने केलेले अन्य गुन्हेदेखील उघडकीस आणून लाखो रुपयांचा ऐवज परत मिळविला आहे.

तीन दिवसांपूर्वी आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखाचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक करपे, निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे तसेच खैरे, मोकल, सानप, राऊत या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना कैशल्याने माहिती काढत आरोपी अनमोल धवने (24) या चोराला 24 तासांच्या आत पकडले. त्याच्याकडून चोरीचा सर्वच्या सर्व दीड लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला. इतकेच नाही तर अनमोलने केलेले अन्य गुन्हेदेखील उघडकीस आणून त्या गुह्यातील सहा लाख 88 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. त्यात 39 विविध प्रकारच्या मौल्यवान वस्तू, परदेशी चलन, दुर्मिळ वस्तू व 16 मोबाईलचा समावेश आहे.