मोबाईल चोरून विकणारी तिकडी गजाआड, चोरीचे 285 मोबाईल हस्तगत

मोबाईल चोरून तर कधी इतरांकडून चोरीचे मोबाईल घेऊन ते कमी किंमतीत विकणार्‍या तिघांच्या टोळीला  शिवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्या टोळीकडून चोरीचे 285 मोबाईल,पाच टॅब आणि एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिवडी येथील दारुखाना परिसरात राहणार्‍या फिरोज बच्चूकारा या तरुणाचा मोबाईल चोरीला गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बाळूराव घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोरे, वळवी तसेच देशमुख, गायकवाड, साळेकर, शेख जमादार, माळोदे, देसाई या पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, दारुखाना परिसरात एक व्यक्ती संशयीतरित्या मोबाईल विकत असल्याची खबर पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या कंपनीचे 48 मोबाईल आढळून आले. त्या मोबाईल बाबत विचारणा केली असता त्याला काहीच उत्तर देता आले नाही. त्यामुळे ते मोबाईल व त्याच्याकडील दुचाकी हस्तगत करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करून अधिक चौकशी केल्यावर त्याचे दोन साथीदार रे रोड रेल्वे स्थानकाजवळील पटरीवर असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने त्या आरोपीसह रे रोड स्थानक गाठून त्याने ज्याच्याकडून मोबाईल घेतले होते त्या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडील बँगांची तपासणी केली असता त्यात विविध कंपन्यांचे ८६ मोबाईल मिळून आले. अशाप्रकारे उस्मान खान (27), प्रकाश परमार (40), दीपक वागेला (22) अशा तिघांना बेड्या ठोकल्या.

घरात मिळाले 151 मोबाईल

तिघांना पकडून 134 मोबाईल हस्तगत झाल्यानंतर चौकशीत धारावीत राहणारा प्रकाश परमार याच्या घरी आणखी मोबाईल असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने धारावी गाठून प्रकाशच्या घराची झडती घेतली असता 151 मोबाईल मिळाले. अशाप्रकारे शिवडी पोलिसांनी तिघा आरोपींना पकडून चोरीचे 285 मोबाईल,पाच टॅब आणि एक दुचाकी असा लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.