समाजमन जागवताना… तृतीयपंथीयांनी कलेतून व्यक्त केल्या भावना

आपल्या मनातील भावना उत्तमरीत्या व्यक्त करणारे माध्यम म्हणजे कला. तृतीयपंथी लोकांच्या जीवनात खूप समस्या आहेत. या समस्या कलात्मक पद्धतीने समाजासमोर आणण्यासाठी 15 वर्षीय रेना हजारी हिने माटुंगा येथे एक खास उपक्रम आयोजित केला. ‘फलक’ असे तिच्या उपक्रमाचे नाव असून यामध्ये सुमारे 50 तृतीयपंथीयांनी आपल्या मनातील भावना छत्र्यांवर उतरवल्या, रंगवल्या.

रेना हजारी ही हिल प्रिंग इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थिनी आहे. समाजातील उपेक्षित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना आपल्यात समाजात सामावून घेण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी रेनाने ‘फलक’चे आयोजन केले. या कार्यक्रमाला ट्रान्स फॅशन डिझायनर साईशा शिंदे हिची प्रमुख उपस्थिती लाभली. रेनाचे गुरू, मेंटॉर सत्येंद्र राणे यांच्या सहयोग आर्ट फाऊंडेशनचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. त्यासोबतच आभा आणि अलर्ट सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थांचे पाठबळ मिळाले.

रेना म्हणाली, कला म्हणजे फक्त दृष्टीला चांगले दिसणारे आश्चर्यकारक तुकडे तयार करणे नव्हे. तर कला म्हणज भावना व्यक्त करणे आणि प्रभाव पाडणे. ‘फलक’ या उपक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांची वास्तविकता समाजापर्यंत पोहोचेल आणि दोन जगांमधील सामाजिक दरी दूर होण्यास मदत होईल, अशी आशा बाळगते.