दोन सराईत आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाची कारवाई

नगर शहरासह उपनगर व संगमनेर तालुक्यात घरात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवून दरोडे टाकून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने जेरबंद केले. रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण (वय 23) व फिलीप नादर चव्हाण (वय 23, दोन्ही रा. सालेवडगांव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यश शेळके (कल्याणरोड, नगर) यांचे तसेच त्यांचे शेजारी राहणाऱ्या तिघांच्या घरी 6-7 अज्ञात व्यक्तींनी दरवाजाचा कडीकोयंडा कटावणीने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर वस्तूंची उचकापाचक करुन चाकूचा धाक दाखवत 4,30,500 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम बॅकेचे एटीएमकार्ड असा ऐवज चोरुन नेला होते. या प्रकरणी कोतवाली पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, प्रशांत ऊर्फ धोळ्या चव्हाण याने 5 ते 6 साथीदारांसह हा गुन्हा केला असून सर्व चिचोंडी पाटील शिवारातील सालेवडगांव रोडवरील माळरानावर लपून बसले आहेत. कटके यांनी लगेच पथकास कारवाईच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करुन सालेवडगांव येथे जात माळरानाची पहाणी केली. त्यांना 6-7 जण एका लिंबाचे झाडाखाली बसलेले दिसले. त्यांना पोलीसची चाहूल लागताच पळून जात होते. पथकाने पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतले. इतर आरोपी पळून गेले. ताब्यात घेतलेल्या रावन ऊर्फ छनक चव्हाण, फिलीप चव्हाण यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द जिल्ह्यात नगर तालुका,अंभोरा जिल्हा बीड,कोतवाली,संगमनेर शहर, पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या दोघांना पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.