उद्धव ठाकरे यांचे विदर्भात जंगी स्वागत…

उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा पहिला टप्पा आज विदर्भातून सुरू झाला. विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या आगमनाने शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारले. नागपूर विमानतळावर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी प्रचंड मोठय़ा संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.

नागपूरहून उद्धव ठाकरे थेट वाशिमला रवाना झाले. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे उद्धव ठाकरे यांनी आई जगदंबा देवीचे दर्शन घेतले. यावेळी बंजारा समाजाच्या उत्कर्षासाठी साकडे घातले तसेच विदर्भावरील संकट दूर करण्याची प्रार्थना केली. पोहरादेवी येथे बंजारा समाजाकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानाची निशाणी म्हणून चांदीचा कडा देऊन स्थानिकांनी प्रेम व्यक्त केले. सेवालाल महाराजांच्या समाधी स्थळाचेही उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. तसेच संत रामराव महाराज समाधीस्थळ, बाबनलाल महाराज मंदिर, श्री हमुलाल महाराज दरबार याठिकाणी कृपाशीर्वाद घेतले. त्यानंतर दिग्रस येथे यवतमाळ आणि वाशिम जिह्यातील शिवसैनिकांसोबत त्यांनी संवाद साधला. मेळाव्याला तुफान गर्दी लोटली होती. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने विदर्भात भगवेमय वातावरण तयार झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार नितीन देशमुख, माजी आमदार संजय देशमुख, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, अनिल राठोड उपस्थित होते.