75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट, पण प्रत्यक्षात तेरा टक्क्यांची घट, पुढील तीन टप्प्यांत मतदान वाढवण्याचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत राज्यात 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट राज्याच्या निवडणूक विभागाने ठेवले होते. पण निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा तेरा टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. त्यामुळे यापुढील लोकसभा निवडणुकीच्या पुढील तीन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत यावर्षी सरासरी 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट राज्याच्या निवडणूक विभागाने ठेवले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 63.7 टक्के तर दुसऱया टप्प्यात 62.71 टक्के मतदान झाले. त्यामुळे आता पुढील तीन टप्प्यांतल्या निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला असून कमी मतदानाच्या ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत.

लोकसभा निवडणुकीत 75 टक्के मतदानाचे उदिष्ट ठेवले होते. त्याची तयारी मागील एका वर्षापासून सुरू होती. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राष्ट्राय पातळीपासून जिल्हापातळी आणि अगदी बूथ पातळीवर तयारी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी चांगले मतदान झाले आहे. त्या बूथवर मतदानाची टक्केवारी टिकवून वाढवण्यासाठी प्रयत्न होणार आहे. पण ज्या ठिकाणी मतदान कमी झाले त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दरम्यान, मतांच्या टक्केवारीतील तफावतीवरून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. हा लोकशाहीवर हल्ला असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.

चोक्कलिंगम यांचा दावा काय?

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले की, तापमानवाढीचा फटका देशातील काही राज्यांना मोठय़ा संख्येने बसला असून त्याचा मतदानावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी वाढली नसली तर कमी देखील झालेली नाही. दुसऱया टप्प्यात 0.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही राज्यात मतदार मोठय़ा संख्येने घटले आहेत. आपल्याकडे कमी झालेले नाहीत असा दावा त्यांनी केला.

फ्लॅशमॉब घेणार, होर्डिंग, बॅनर पोस्टर्समार्फत जनजागृती

ज्या विभागात कमी मतदान झाले त्या ठिकाणी पथनाटय़, रॅली आणि शहरी भागात फ्लॅशमॉबसारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याशिवाय होर्डिंग, बॅनर पोस्टर्समार्फत जनजागृती सुरू आहे. आता मतदान जवळ आले तेव्हा घरोघरी जाऊन जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. कमी मतदान होणाऱया बूथसाठी चार ते पाच लोकांच्या टिम तयार केल्या आहेत. शहरी भागात पालिकेचे कर्मचारी आणि ग्रामीण भागात अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेवकांच्या चार-पाच जणांच्या टिम केल्या आहेत या टिम आता बूथनुसार विभागातील वस्तीमध्ये जातील. एका बूथवर सरासरी एक हजार ते दीड हजार मतदार असतात. या टीम प्रत्येक घरी दोनदा किंवा काही ठिकाणी तीन वेळा जातील. मागच्या निवडणुकीत मतदान केले होते का नाही याची माहिती घेण्यात येईल. मतदान का केले नाही ? अडचण काय आहे? याबाबत त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल. आणि मतदानातील अडचणी सोडवण्यात येतील. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल अशी आशा निवडणूक विभागाला आहे.