जात पंचायतीच्या एकाही पंचाला अटक नाही

जामखेड पोलीस ठाण्यात जात पंचायतीच्या 22 पंचांविरोधात गुन्हा दाखल होऊन पाच दिवसांनंतरही अद्याप एकाही पंचास अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात डवरी गोसावी समाजातील जात पंचायतीशी संबंधित मुंबईतील काही राजकीय पदाधिकाऱयांनी जामखेड येथे येऊन पीडितांवर दबाव टाकत हे प्रकरण परस्पर मिटविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाव्यतिरिक्त हे प्रकरण परस्पर मिटविण्याचा प्रयत्न केल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) व जात पंचायत मूठमाती अभियानाच्या वतीने राज्यभरात रान पेटवू, असा इशारा जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्याचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिला आहे.

मुलीला नांदविण्यास नकार देणाऱया सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे जामखेड येथील एका कुटुंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावला असून, डवरी गोसावी जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जामखेड येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 5 जुलै रोजी 22 पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.

याबाबत माहिती देताना जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्याचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले, जामखेड येथील डवरी गोसावी समाजाच्या जात पंचायतीने दिलेल्या निकालाबाबत आमच्याकडे पीडितांनी माहिती दिली होती. जात पंचायत मूठमाती अभियानाच्या पदाधिकाऱयांनी तसेच संगमनेर येथील कार्यकर्त्या ऍड. गवांदे यांनी त्यांना पूर्ण आधार व सहकार्य देऊन तक्रार दाखल करण्यास मदत केली आहे. 5 जुलैला तक्रार दाखल झाली आहे. अंनिस पूर्णपणे पीडितांच्या पाठीशी उभी असून, त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.

गुन्हा दाखल झालेले संशयित पंच

राजाराम सखाराम शिंदे, बाबूराव राघू शिंदे, शिवाजी भिवाजी शिंदे, हरिश्चंद्र बाबूराव शिंदे (सर्व रा. यवत, ता. दौंड), साहेबराव भिवाजी शिंदे, बाबाजी पिराजी आहेर, लखन साहेबराव शिंदे (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर), अनिल भिवाजी सावंत, भिवाजी नाना सावंत, बाबूराव तात्या चव्हाण, शंकर भैरू सावंत, श्यामराव भीमराव चव्हाण (रा. पाटस, ता. दौंड), भगवान शंकर शिंदे (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), रूपचंद दत्तात्रय सावंत, संजय दगडू सावंत (रा. पेडगाव रस्ता, ता. श्रीगोंदा), नाथा नारायण बाबर (रा. हंडीनिमगाव सुरेशनगर, ता. नेवासा), पिराजी राजाराम शिंदे, शिवराम भैरू सावंत, दया सावंत (रा. नाथनगर सोनई), चिमाजी गंगाधर शेगर (रा. पळसदेव, ता. इंदापूर), बाबाजी शिंदे (रा. चांदा), प्रकाश सावंत (रा. खडकी, ता. दौंड)