अदानी कंपनीचा सल्लागार केंद्राच्या समितीवर

अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी लि. या कंपनीचे सल्लागार असलेल्या जनार्दन चौधरी यांना मोदी सरकारने पर्यावरण खात्याच्या तज्ञ मूल्यांकन समितीचे सदस्य केले असून, या समितीने अदानी ग्रीन एनर्जी लि. कंपनीचा सातारा येथील प्रकल्प मंजूर केल्याचे समोर आले आहे.

जलविद्युत आणि नदी खोरे ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे मंजुरीपूर्व मूल्यांकन करणाऱ्या समिती सदस्यांपैकी फक्त एकच खासगी कंपनीचा सल्लागार आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो अदानींच्या ऊर्जानिर्मिती कंपनीचा प्रमुख सल्लागार आहे. मैत्री असावी तर अशी, असे शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. अदानी प्रधान सेवकाने अदानी कर्मचारी जनार्दन चौधरी यांना ईएसीचे सदस्य केले आहे, असे ट्विट केरळ काँग्रेसने केले आहे.

z तज्ञ मूल्यांकन समितीसमोर अदानी यांच्याच कंपनीचे महाराष्ट्र आणि आंध्रातील 10 हजार 300 मेगावॅट क्षमतेचे 6 प्रकल्प मान्यतेसाठी विचाराधीन आहेत. सातारा येथे अदानींच्या 1500 मेगावॅट प्रकल्पाला 17 ऑक्टोबरला समितीने मंजुरी दिली आहे.