एक कोटी 41 लाखांचे परदेशी चलन जप्त

1 कोटी 41 लाख रुपयांच्या परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी प्रवाशांना सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) अटक केली. माकोटो तानी आणि गुन्यापुनिसा फूंनासेट अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे जपान आणि थायलंडचे रहिवासी आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी चलन तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली आहे. शनिवारी सायंकाळी माकोटो आणि गुन्यापुनिसा हे दोघे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. माकोटोकडे जपान तर गुन्यापुनिसाकडे थायलंड देशाचा पासपोर्ट होता. ते दोघे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉकला जाणार होते. त्यांच्या बॅगेची झडती घेतली. त्याने बॅगेच्या पाच कप्प्यांमध्ये 1 लाख 41 हजार 500 डॉलर लपवले होते. त्या दोघांनी परदेशी चलन तस्करीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. त्या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या त्या दोघांच्या माहितीसाठी एआययू हे त्या देशाच्या दूतावासाशी पत्रव्यवहार करणार आहे.