अर्धहलासन

>> सीए अभिजित कुळकर्णी

आसने अनेक प्रकारची आहेत. काही आसने ही उभ्याने केली जातात, काही आसने बसून, काही आसने पोटावर झोपून, तर काही आसने पाठीवर झोपून केली जातात. आज आपण पाठीवर झोपून केल्या जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वाचे, दिसायला साधेसोपे, करायला मात्र काही वेळा कठीण असे आसन बघू. या आसनाचे नाव आहे अर्धहलासन. याला दुसरे नाव आहे उत्थित पादासन.

कसे करावे?

सर्वप्रथम सरळ पाठीवर झोपावे. पाठीवर झोपल्यानंतर आपले दोन्ही हात खाली सोडावेत. हात आपल्या शरीराला चिकटवून ठेवावेत. हातांचे तळवे जमिनीला लावून ठेवावेत. इतके झाल्यानंतर डावा पाय सावकाशपणे वर उचलावा. तो जमिनीपासून 30 अंशांपर्यंत वर उचलून ठेवावा. 20 क्षणांपर्यंत या स्थितीमध्ये स्थिर रहावे. त्यानंतर पाय आणि थोडा वर उचलावा 60 अंशांपर्यंत. थोडा वेळ या स्थितीमध्ये स्थिर रहावे. थोडय़ा वेळाने पाय सावकाश खाली आणावा आणि नंतर हीच क्रिया उजव्या पायाने करावी. याला एकैकपाद अर्धहलासन म्हणतात. कारण आपण हे एकेका पायाने करतो. दोनवेळा या आसनाची आवर्तने दोन्ही पायांनी झाल्यानंतर थोडा विश्राम घ्यावा आणि नंतर दोन्ही पाय सावकाशपणे वर उचलावेत. प्रथम 20 अंशांपर्यंत वर उचलावेत. पाय गुडघ्यांमध्ये सरळ ठेवावेत. काही क्षणांनंतर पाय 40 अंशांपर्यंत वर उचलावेत. पुन्हा काही क्षण स्थिर रहावे आणि 60 पर्यंत पाय वर उचलावेत आणि शरीराची ही स्थिती तीस ते चाळीस क्षणांपर्यंत स्थिर ठेवावी. शरीर स्थिर असले पाहिजे, त्याच वेळी आपले मनही स्थिर असले पाहिजे. आपण पाय वर उचलतो हे जरी खरे असले तरी त्या वेळी अनाहूतपणे आपण आपले खांदे, मान आणि पोटांचे स्नायू हे थोडे घट्ट / कडक करतो. हा घट्टपणा / कडकपणा नसावा. शरीराचे इतर सर्व स्नायू सहज स्थितीमध्ये ठेवावेत.

शब्दोत्पत्ती

‘हल’ म्हणजे नांगर. शेतात नांगर चालवताना तो जसा दिसतो, तशीच आपल्या शरीराची आकृती दिसते म्हणून या आसनाला अर्धहलासन म्हणतात. या आसनाचे दुसरे नाव उत्थित पादासन. उत्थित म्हणजे वर उचललेली स्थिती. पाद म्हणजे पाय.

आरोग्याचे लाभ

अर्धहलासनाच्या अभ्यासाने पोटाच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. तसेच कमरेचे स्नायूही मजबूत होतात.
पोटातील पचन आणि उत्सर्जन संस्थेचे विभिन्न अवयव आहेत. त्यावर या आसनाचा उत्तम परिणाम होऊन पचन सुधारते.
पोटाचे स्नायू मजबूत झाल्याने सर्वांगीण आरोग्यामध्ये चांगलीच सुधारणा होते. पायांमधून रुधिराभिसरण विरुद्ध दिशेने होते आणि त्यामुळे पायाच्या तळव्यांना थोडा थंडावा मिळतो. या आसनाने बद्धकोष्ठता दूर होते.
आसन करताना पाय वर उचलल्यानंतर आपला श्वासोच्छ्वास चालू ठेवावा.

योगशिक्षक, भारतीय योग मंदिर, www.bymyoga.in