सख्खा शेजारी गेला

>> द्वारकानाथ संझगिरी  

आलेल्या फोनवर ‘सर कळलं का?’ असं एका तरुण पत्रकाराने सांगितल्यावर हृदयाचा ठोका चुकला. बातमी स्तब्ध करणारीच होती.

‘शिरीष कणेकर गेले’. परवाच त्यांचा 80 वा वाढदिवस झाला होता. काही लेख वाचले होते. पण काळाची एक क्रूर फुंकर त्यांना आपल्यातून घेऊन गेली.

माझं मन थेट 1967 – या काळात गेलं. क्रिकेटची आवड जन्मजात होती. त्यावेळी शिरीष कणेकर ‘मोहिनी’ मासिकात क्रिकेटवर लिहीत. त्यांनीच मला सर नेविल कार्ड्सच्या दरवाजावर आणून सोडलं. कार्ड्सच्या लिखाणाचा मग माझ्या लिखाणावर कायमस्वरूपी प्रभाव पडला. त्याच काळात मला सिनेमाची गोडी लागली आणि शिरीष कणेकरांचं लिखाण अधाशासारख वाचलं गेलं.

त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे  त्यांची लिखाणाची शैली. ती आकर्षक होती. हा माणूस आपल्या मनातलं लिहितो असं वाटायचं. जो आवडतो त्याच्याबद्दल लिहिताना पेनात शाईऐवजी मध घातला जाई, जो आवडत नसे त्याच्याबद्दल लिहिताना शाईची जागा कडवट कारल्याचा रस घेई. पण बऱयाच लोकांना ते भावत असे.

व्यक्तिशः त्यांचा माझा संबंध माझ्या कॉलेजच्या काळात आला. आम्ही सर्व मित्र शिवाजी पार्कला स्विमिंग पूल कॅफेत रोज संध्याकाळी भेटत असू. तिथे सिनेमाची जुनी गाणी लागायची. त्यावेळी शिरीष तिथे काहीवेळा येत असे. कधीतरी मग गप्पा व्हायच्या. बऱयाचदा त्या एकतर्फी असतं. म्हणजे आमचा प्रश्न त्यांची उत्तरं.आमची आवडती 10 गाणी त्यांच्या आवडत्या 50 गाण्यात नसत. पण ती त्यांची स्टाईल होती. एक-दोनदा ते आम्हाला गाणी ऐकायला त्यांच्या घरी घेऊन गेले होते. त्यावेळी ते वरळीला राहत. मी लिहायला सुरुवात केली आणि मग भेटी फारशा झाल्या नाहीत.

त्यांचे मित्र माझे मित्र होते. त्यांचे संपादक माझे संपादक, लिखाणाचे आवडीचे विषय तेच, पण तरीही का कुणास ठाऊक दोस्तांना झाला नाही. पण मला त्यांचं काही गोष्टींचं कौतुक नेहमी वाटलं आहे. इंग्लिश पत्रकारिता करून त्यांनी मराठीत विपुल लेखन केलं. शेवटच्या क्षणापर्यंत ते लिहीत होते. लेखन ते एकपात्री प्रयोग ही उडी प्रेक्षणीय होती. पुढे नोकरी न करता मराठीत असं फ्रिलान्सिंग सोपं नाही. त्यांनी टेलिव्हिजन का गंभीरपणे घेतला नाही हे मला उमगल नाही. बोलणं ज्याचं शक्तिस्थान आहे त्यांच्यासाठी ते माध्यम उत्तम आहे. ‘सामना’त आम्ही बरीच वर्षे सख्खे शेजारी होतो. 2003 च्या विश्वचषकाच्या वेळी मी ‘सामना’ तर्फे दक्षिण आफ्रिकेला जाणार होतो. संपादक आणि मित्र संजय राऊत म्हणाले, ‘शिरीषला पण स्तंभ लिहायचा आहे. लिहू देना?’ संजय साक्षी आहे. मी म्हटलं, ‘अरे मजा येईल, बरोबर एक ताकदवान लेखक असला की आपला दर्जाही वाढतो. थोडी स्पर्धा असली की लिखाण अधिक चांगलं होईल.’

त्यानंतर कित्येक वर्षे रविवारी आमची सदरं एकाखाली एक असत. सिनेमा किंवा क्रिकेटमध्ये एखादी घटना घडली आणि फोन त्यांना गेला की ते विचारत, ‘तो लिहितोय?’. काही विषय त्यांना आंदण दिले होते, काही मला, विशेषतः क्रिकेटचे. काही वेळा दोघेही आम्ही लिहीत होतो. मला शिरीषकडे काय प्रतिक्रिया येत कल्पना नाही, पण माझ्याकडे येणाऱया प्रतिक्रियेत वाचकांना आमचा शेजारधर्म आवडत होता असं दिसायचं.

मला त्यांचे सत्तरीतले लेख आजही अधिक भावतात. त्यांनी ‘मोहिनी’त लिहिलेला दिलीपकुमारवरचा लेख  किंवा 1974 साली भारताचा लॉर्ड्सवर 42 धावांत झालेल्या ऑल डाऊननंतरचा लेख, किंवा तलतची मुलाखत असे अनेक. पुढे पुढे नर्मविनोद खूप बोचरा झाला, लेखांत अहमपणा वाढला. पूर्वी लेख शोधून वाचायचो, ते थांबलं. पण समोर आल्यावर वाचला नाही असं झालं नाही.

जर पुन्हा ‘सामना’साठी रविवारी कॉलम लिहिला तर शिरीष कणेकरांचा शेजार मी मिस करेन.

 [email protected]