रंगपट – अनुत्तरित प्रश्नांची गोष्ट!

आयुष्यात घडलेल्या काही अचाट घटनांविषयी सांगत आहेत अभिनेते, गायक व निवेदक विघ्नेश जोशी.

माझ्या आयुष्यात अशाच काही घटना घडल्या, ज्यांची उत्तरे मात्र मला अद्याप मिळालेली नाहीत. सहा-सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्यासोबत गायिका असलेली माझी पत्नी कल्याणी तसेच गायक मयूर सुकाळे, तबलावादक संदीप पवार आणि अभिनेते-दिग्दर्शक विजय गोखले असे मिळून आम्ही ‘कुवेत महाराष्ट्र मंडळ’ येथे आमचा ‘मानवंदना’ कार्यक्रम करण्यासाठी गेलो होतो. आमचा तो कार्यक्रम संपायला अर्धा तास उशीर झाला. त्यातच भेटायला आलेले रसिक प्रेक्षक, त्यामुळे आम्हाला तिथून निघायला उशीर झाला. याचा परिणाम असा झाला की, आम्ही कुवेत एअरपोर्टला जेव्हा पोहोचलो तेव्हा आमच्या पुढे साधारणपणे 250 ते 300 माणसे रांगेत उभी होती. आम्हाला भीती होती की, या सगळय़ात कदाचित आपले विमान चुकेल किंवा आपल्यामुळे अधिक उशीर होईल. आम्ही त्या रांगेत उभे असताना कुठूनतरी एक माणूस आला. तो आमच्याशी हिंदीत संभाषण करायला लागला. तो म्हणाला, ‘‘आपको मैं जेट एअरवेजके काऊंटर पर लेके जाता हूं.’’ आम्ही कुठलाही विचार न करता त्या ट्रॉलीवर आमची वाद्ये व इतर सामान ठेवले. पाचव्या मिनिटाला आम्ही जेट एअरवेजच्या काऊंटरजवळ पोहोचलो. तिथले सगळे सोपस्कार पूर्ण झाले आणि बार्ंडग पासेस घेऊन आम्ही सिक्युरिटी चेककडे जाणार तेवढय़ात आमच्या लक्षात आले की, आम्हाला सोडायला आलेला तो माणूस आजूबाजूला कुठेच दिसत नाही. सगळय़ा धावपळीत त्याला ‘धन्यवाद’ म्हणायचे राहूनच गेले होते. आम्ही विमानात गेलो, तर ज्या माणसाने आम्हाला बोर्डिंग पासेस दिले होते तोच माणूस समोर उभा होता. ‘‘सर, मैने आपको ‘क्राइम पेट्रोल’ में देखा है. सर, आपने बोर्डिंग पास ठीकसे देखा नहीं क्या? आपको मैने बिझनेस क्लास में शिफ्ट किया है,’’ असे तो म्हणाला. हे ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो. का, कशासाठी? हे विचारायच्या आतच त्याने माझ्याशी हस्तांदोलन केले आणि ‘हॅपी जर्नी’ असे म्हणत तो निघूनही गेला. पुढे अजून एक योगायोग घडला त्या विमानातली हवाई सुंदरी आमच्या मयूरची कॉलेजमधली मैत्रीण निघाली. ते वेगळे, पण ज्या माणसाने आम्हाला पाच मिनिटांत काऊंटरपर्यंत नेले तो माणूस कुठून आला, का आला, त्याने आम्हाला बिझनेस क्लासमध्ये का शिफ्ट केले? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. असाच अजून एक प्रसंग आहे, परंतु तो वेगळय़ा ठिकाणचा आहे. आता एका वाहिनीवर एक मालिका येणार आहे, ‘सिंधुताई माझी माई.’ या मालिकेचे शूटिंग अंकलखोप, भिलवडीजवळ सुरू आहे. तिथे जाण्यासाठी मी आष्टा गावात उतरतो आणि तिथून रिक्षाने अंकलखोपला जातो. तिथे रफिकभाई नावाचे एक रिक्षाचालक आहेत. त्यांना मी माझ्या येण्याबद्दल नेहमी कळवतो. एकदा मुंबईहून रात्री तिथे जाण्यासाठी निघताना मी त्यांना फोन केला, पण ते झोपले होते म्हणून त्यांच्याशी बोलणे झाले नाही. दुसऱया दिवशी मी आष्टय़ाला पहाटे पावणेसहाला उतरलो आणि पाहतो तर काय, माझ्यासमोर रफिकभाई हजर होते. मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्या मुलांनी माझ्या येण्याबद्दलचा निरोप तुम्हाला दिला का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘नाही दादा.’’ मग त्यांना मी विचारले, ‘‘अहो, मग तुम्ही कसे आलात अचूक याच बसजवळ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘माहीत नाही दादा, पण मला असे वाटले की, आज तुम्ही येणार असाल म्हणून मी बसची वाट बघत होतो.’’ हे ऐकून मला काही कळेना. मी त्यादिवशी शूटिंगला येणार, असे त्यांना का बरे वाटले असेल? अर्थात, याही प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात हेच खरे! ‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त’ म्हणायचे, इतकेच आपण करू शकतो.
n शब्दांकन ः राज चिंचणकर