विज्ञान-रंजन – बियाण्यांची ‘कुपी’

>> विनायक

रशियन पीक संशोधक निकोलय वॅविलॉव यांच्या कार्याची माहिती आपण मागच्या लेखात घेत होतो. त्यांच्या कार्याची महती खरं म्हणजे एक-दोन लेखांत संपणारी नाही, पण निदान त्याविषयी थोडी जाणीव व्हावी आणि बदलत्या हवामानाला क्षणोक्षणी तोंड देणाऱया जगातील वनस्पतींचे भविष्यकाळात काय होणार, तसेच विविध पिकांची बियाणे सुरक्षित ठेवण्याच्या वॅविलॉव यांच्या संकल्पनेला जगाने कसा प्रतिसाद दिला याबाबत या लेखात जाणून घेऊ.

तर वॅविलॉव यांनी कितीतरी वनस्पती आणि धान्य बियाण्यांचे सुमारे 1 लाख 25 हजार नमुने संग्रहित केले. तो काळ 1920 ते 30 या दशकातला. 1917 मध्ये रशियात क्रांती होऊन झारची राजवट संपली. लेनिन सत्तेवर आले. त्यांच्या कारकीर्दीत वॅविलॉव यांचं संशोधन बहरलं, पण त्यानंतर आलेल्या स्टॅलिनची राजवट हडेलहप्पी स्वरूपाची होती. वॅविलॉव लेनिन ऑग्रिकल्चर संस्थेचे संचालक असताना ट्रॉफिन लायसेको याने छद्म विज्ञानातून ‘गहू गोठवून’ कालांतराने त्याची पुन्हा लागवड करता येते अशा प्रकारचे काही ‘संशोधन’ केले. ते भंपक असल्याचे त्याच्याशी केलेल्या संपका&तून वॅविलॉव यांच्या लक्षात आलं. पण त्यांनी त्याला विरोध करताच लायसेकोच्या बाजूने असलेल्या स्टॅलिन राजवटीने वॅविलॉव यांना दुष्काळावर मात करणाऱया धान्याची टिकाऊ, शक्तिशाली बियाणं तीन वर्षांत करण्याचा आदेश दिला.
असे संशोधन विशिष्ट कालमर्यादेत होतेच असे नाही. परिणामी चिडलेल्या राजवटीने या महान संशोधकाला ‘गुन्हेगार’ ठरवले. त्यांच्या किमान 400 वेळा भीषण ‘उलटतपासण्या’ (इन्टरॉगेशन) झाल्या. 1943 पासून त्यांना एकांतवासात डांबण्यात आले. एखादा पावाचा आणि माशाचा व घाणेरडा रस्सा असा ‘आहार’ त्यांना मिळायचा. जगाचं ‘जेवण’ सकस अन्नाचं व्हावं यासाठी आयुष्य वेचणाऱया माणसावर निकृष्ट जेवणाची वेळ आली. परंतु न डगमगता वॅविलॉव आपल्या मतांवर ठाम राहिले. शेवटी त्यातच त्यांचा 26 जानेवारी 1943 रोजी अंत ओढवला.

त्यांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी रशियात बदललेल्या राजवटीने त्यांचे महत्त्व जाणले. निकिता कुश्चेव ‘यूएसएसआर’चे (सोव्हिएतचे) अध्यक्ष असताना एका शेतकी संस्थेला वॅविलॉव यांचे नाव दिले गेले. वॅविलॉव आणि त्यांचे सहकारी एवढे बहाद्दर की, दुसऱया महायुद्धात नाझी सैन्याने लेनिनग्राड शहराला वेढा घातल्यावर होणाऱया उपासमारीच्या काळात संशोधन पेंद्रात अडकलेल्या जैवशेतकी संशोधकांना साठवलेली बियाणं आणि वनस्पती आहारासाठी उपलब्ध होती, परंतु त्यांनी ती तशीच भावी काळातील मानवजातीसाठी अबाधित ठेवून अन्नाअभावी मरण पत्करलं! केवढी ही विज्ञाननिष्ठा! अशा अनेक नीडर संशोधकांच्या प्रयत्नांतून आपल्याला अनेक सुखं प्राप्त होत असतात, पण त्याची आपल्याला बिलकूल कल्पना नसते.

निकोलय वॅविलॉव आणि त्यांच्या सहकाऱयांना भयानक त्रास सोसावा लागला आणि त्यात त्यांचा अंत झाला ही शोकांतिकाच. पण नंतरच्या काळात त्यांची विविध बियाण्यांचा साठा करणारी ‘बँक’ बनवण्याची संकल्पना प्रत्यक्षात आली. आज ‘ग्लोबल सीड व्हॉल्ट’मध्ये सुमारे लाखो प्रकारची बियाणं जतन केलेली आहेत. हा ‘सीड व्हॉल्ट’ पिंवा ‘बियाण्यांची तिजोरी’ नॉर्वेमधल्या स्वालबार्ड बेटावर अत्यंत सुरक्षित जागी बांधलेली आहे. जगातली सर्वात सुरक्षित इमारत असे या ‘व्हॉल्ट’ला म्हटले जाते. याचे कारण म्हणजे आर्क्टिक भागात, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात 77 अक्षांशावरच्या प्रचंड थंडीत आणि कायम बर्फ असणाऱया प्रदेशात ती बांधलेली आहे. या ‘सीड व्हॉल्ट’मध्ये 130 मीटर किंवा 430 फूट खोलवर एक बोगदा बांधून त्याच्या टोकाला असलेल्या भक्कम ‘व्हॉल्ट’मध्ये जगातल्या हिंदुस्थानसह 50 देशांमधली सकस धान्य आणि वनस्पतींची बियाणे अत्यंत सुरक्षित ठेवलेली आहेत.

1980 मध्ये अशा ‘दूरस्थ’ व्हॉल्टची कल्पना केली जाण्यामागचे कारण बाकीच्या देशांतले सतत बदलते हवामान, युद्ध आणि त्यातून होणारे उत्पात, वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग यापासून ही बियाणे सुरक्षित ठेवायची असतील तर त्यांच्या आसपासही कोणा प्राण्याचा, कीटकांचा, पक्ष्यांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसांचा वावरही नको. पूर्वीही जगातल्या सुमारे 1700 सीड बँकांमध्ये (त्यांना ‘जेने’ बँक म्हणत) बियाणं साठवली होती. परंतु ती आधी उल्लेख केलेल्या आपत्तीपासून मुक्त नव्हती. नॉर्वेतल्या ‘सीड व्हॉल्ट’ला तसा धोका नाही. तिथे आता 9 लाख 30 हजार ‘बियाणं’ जतन करून सुरक्षित ठेवली आहेत. स्वालबार्डमधली ही जागा नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांपासून मुक्त असल्याचे मानले जाते.