नार्कोटिक्सचे अधिकारी सांगून व्यावसायिकाचे केले अपहरण, भामट्यांच्या टोळीचा म्होरक्या गजाआड

वर्सोवा येथील रेस्टॉरंटमधून एका व्यावसायिकाला सहा जणांच्या टोळीने हेरले. नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी असल्याची ओळख सांगून त्यांनी व्यावसायिकाला सोबत नेले. 50 लाखांची मागणी करत पैसे न दिल्यास ड्रग्जच्या गुह्यात अडकविण्याची धमकी दिली. अखेर साडेपाच लाख व महागडा मोबाईल घेतल्यानंतर व्यावसायिकाची सुटका केली. आरोपी खंडणी उकळून सटकले. पण युनीट-9चे दया नायक यांनी टोळीच्या म्होरक्याला शिताफीने पकडले.

किरण (नाव बदलेले) हे व्यावसायिक 30 तारखेला वर्सोवा येथील एका हॉटेलात गेले होते. तेथे सहा जणांनी त्यांना हेरले आणि अँटी नार्कोटिक्स घाटकोपर युनीटचे पोलीस अधिकारी असल्याची ओळख सांगत सोबत चलण्यास सांगितले. आरोपींनी किरण यांना रात्रभर फिरवले. 50 लाख दे नाहीतर ड्रग्जच्या गुह्यात अडकवू, असे धमकावले. दरम्यान, आरोपींनी किरण यांच्याकडून साडेपाच लाख, एक मोबाईल फोन घेतला आणि किरण यांना जाऊ दिले. आपल्याकडून खंडणी उकळल्याचे लक्षात आल्यानंतर किरण घाबरले आणि याची वाच्यता कुठे केली नाही. पोलिसांविरोधात तक्रार दिल्यास आपल्याला भारी पडेल अशा भीतीखाली ते होते. अखेर 9 तारखेला किरण यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनीट-9ने समांतर तपास सुरू केला. सहआयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली युनीट प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सचिन पुराणिक, सपोनि. उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, स्नेहल पाटील तसेच कोळी, महेश मोहिते, शार्दुल बनसोडे, प्रशांत भुमकर या पथकाने खबऱयांना कामाला लावून तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू केला. अखेर या गुह्यातील मुख्य आरोपी दीपक जाधव हा गोरेगाव येथील डॉमेंट्रीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दया नायक व त्यांच्या पथकाने गोरेगावात जाऊन दीपकच्या मुसक्या आवळल्या.

दीपकला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता अन्य पाच जणांच्या साथीने त्या व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याची कबुली त्याने दिली. व्यावसायिकाकडे 50 लाखांची मागणी केली होती. पण त्याच्याकडून साडेपाच लाखच उकळता आले. ही रक्कम एनईएफटी, पेटीएम तसेच रोकड स्वरूपात स्वीकारली होती. आरोपी दीपकविरोधात पुण्यातील मुथूट फायनान्स रॉबरी, डी.एन. नगर येथील अपहरण आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दोन असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.