मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल!

नव्या वर्षाचे स्वागत धूमधडाक्यात करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे आज चांगलेच हाल झाले. मध्य रेल्वेने रविवार असल्याने मेगाब्लॉक घेत माटुंगा-मुलुंडदरम्यानच्या जलद मार्गावरील आप-डाऊनच्या सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवल्या, तर पश्चिम रेल्वेवर आज रविवारमुळे आधीच कमी गाडय़ा असतानाच साध्या 17 लोकल रद्द करत त्याजागी एसी लोकल चालवल्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉकमुळे लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. सर्वच लोकल एकाच मार्गावरून धावत असल्याने घाटकोपर, कुर्ला, शीव, दादर, परळ स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक नव्हता, मात्र रविवार असल्याने गाडय़ांची संख्या कमी होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.