मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या! राहुल गांधी इज बॅक…लोकसभेत जोरदार टोलेबाजी आणि तडाखे

भाजपच्या राजकारणाने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली. भारतमातेची हत्या केली. भाजपचे लोक देशभक्त नाहीत तर देशद्रोही आहेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारला सुनावले. अवघ्या 35 मिनिटांच्या भाषणात जोरदार टोलेबाजी आणि तडाखे देत राहुल गांधींनी भाजप आणि केंद्र सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत जबदरस्त हल्लाबोल केला.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्दय़ावर पंतप्रधान मोदींनी मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. मंगळवारपासून अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज दुसऱया दिवशी चर्चेची सुरुवात राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. राहुल गांधी यांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. सुरुवातीला त्यांनी पुन्हा खासदारकी बहाल केल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. ‘‘गेल्या वेळी मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्योगपती अदानी मुद्दय़ावर बोललो तेव्हा तुमच्या नेत्यांना (भाजप नेते) वेदना झाल्या. तुम्हालाही (ओम बिर्ला) वेदना झाल्या. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण मी केवळ सत्य बोलतो. भाजपच्या मित्रांनी या वेळी घाबरू नये. कारण मी अदानींवर नाही तर अविश्वास ठरावावर बोलणार आहे,’’ असा टोला लगावतानाच राहुल गांधींनी महान कवी रुमी यांच्या ‘जो शब्द दिल से आते है, वो शब्द दिल में जाते हैं’ या ओळींची आठवण करून दिली. आजचे भाषण त्यांचे जोरदार कमबॅक ठरले.

रावण दोघांचे ऐकायचा; त्याप्रमाणे मोदी ऐकतात

पंतप्रधान मोदी देशाचा आवाज ऐकत नाहीत. रावण जसा कुंभकर्ण आणि मेघनाद या दोघांचे ऐकायचा. त्याप्रमाणे मोदी हे अमित शहा आणि अदानी या दोघांचे ऐकतात. लंका हनुमानाने जाळली नाही, तर लंका रावणाच्या अहंकाराने जळाली. रामाने रावणाला नाही मारले, रावणाला त्याच्या अहंकाराने मारले, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. पण आपले पंतप्रधान आतापर्यंत तेथे गेले नाहीत. मणिपूर हा हिंदुस्थानचा भाग नाही असे पंतप्रधानांना वाटते. ते मणिपूरबद्दल बोलतही नाहीत. परंतु वास्तव सांगायचे तर मणिपूर आता उरले नाही. मणिपूरचे दोन भागांत विभाजन झाले आहे. तुम्ही मणिपूरचे तुकडे केले आहेत.

मणिपूर दौऱयात मी महिला आणि मुलांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. रिलीफ कॅम्पमध्ये एका महिलेला मी विचारले, काय झाले होते? ती महिला म्हणाली, माझ्या मुलाला गोळी मारली. मी रात्रभर त्याच्या प्रेताबरोबर झोपले होते. दुसऱया रिलीफ कॅम्पमध्ये एका महिलेला विचारले, काय झाले? ती महिला काहीच बोलू शकली नाही. ती चक्कर येऊन पडली. राहुल गांधी हे अनुभव सांगत असताना सत्ताधारी बाकांवरून हे खोटं आहे अशी आरडाओरड होताच ‘मी खोटं कधी बोलत नाही, तुम्ही बोलता,’ असा टोला लगावला.

तुम्ही देशभक्त नाही तर देशद्रोही आहात. पंतप्रधान मोदी मणिपूरला जात नाहीत कारण त्यांनी तेथे हिंदुस्थानची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही तर खुनी आहात असे स्पष्ट शब्दात राहुल गांधी यांनी सुनावताच भाजप खासदारांनी गोंधळ घातला.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतमाता आपली आई आहे. त्यामुळे बोलताना हे लक्षात ठेवावे असे सांगितले. त्यावर राहुल गांधी म्हणाले, मी आदरानेच बोलतो आहे. माझी एक आई (सोनिया गांधी) इथे बसली आहे. दुसरी आई ‘भारतमाता’ तिची हत्या मणिपूरमध्ये भाजप सरकारने केली. हिंदुस्थानचे लष्कर एका दिवसात तिथे शांतता प्रस्थापित करू शकते. परंतु ते लष्कर तैनात करत नाहीत. कारण सरकारला मणिपूरमध्ये देश संपवायचाय.