गणेशोत्सव मंडप परवानगीत विघ्न; अर्ज ऑनलाइन, शुल्क मात्र ऑफलाईन

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर आल्यामुळे मंडळांच्या तयारीला सुरुवात होत असताना पालिकेची परवानगी, शुल्क आणि ऑनलाईन अर्जावरून मात्र प्रचंड गोंधळ सुरू आहे. पालिकेने आश्वासन दिलेले असताना अनेक मूर्तिकारांना  अद्याप शाडूची माती मिळालेली नाही. तर मंडप परवानगीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असताना अनामत रक्कम मात्र वॉर्ड ऑफिसमध्ये भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यातच गेल्या वर्षी लाईटसाठी जमा केलेले डिपॉझीट अद्याप मिळाले नसल्याने मंडळांची कोंडी झाली आहे.

गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून भव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे किमान दीड ते एक महिना आधीपासून मंडप उभारणे, देखावे बनवणे, डेकोरेशन करणे अशी कामे सुरू असतात. शिवाय अनेक मंडप रस्त्याशेजारी असल्याने वाहतुकीचे, प्रवाशांचेही नियोजन करावे लागते. त्यामुळे मंडप परवानगी वेळेत मिळणे गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या ‘एन’ वॉर्ड ऑफिसमध्ये आज पालिका प्रशासन आणि गणेशोत्सव समितीची संयुक्त बैठक पार पडली. या वेळी मंडळांच्या समस्यांचा पाढाच समन्वय समितीकडून वाचण्यात आला. या वर्षीपासून एक हजार रुपये अनामत रक्कम भरण्याची सक्ती मागे घ्यावी, कृत्रीम तलावांची संख्या वाढवावी, सिग्नलचा अडथळा दूर करावा, अशा मागण्याही करण्यात आल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली. सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकप्रसंगी पोलीस, वाहतूक विभाग, समन्वय समितीचे सहकार्यवाह ओंकार सावंत, प्रदीप पांडे, दिलीप बामणे, प्रकाश पाटील, केतन शहा, दत्तात्रेय गोरे, सुधीर मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, समन्वय समितीच्या मागणीला प्रतिसाद देत एक हजार रुपयांची अनामत रक्कम 100 रुपये करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.

स्वस्त दरात वीज द्या

 ‘अदानी’कडून गतवर्षी घेतलेली विजेसाठी घेतलेली दोन ते दहा हजारांची अनामत रक्कम तातडीने परत करावी आणि  स्वस्त दरात वीज द्यावी अशी मागणीही समन्वय समितीकडून करण्यात आली. तसेच रस्त्यांवरील धोकादायक झाडांची छाटणी करावी, फुटपाथ दुरुस्ती करावी, आगमन विसर्जन मार्गात पार्किंग केलेली वाहने तातडीने हटवावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

13 ऑगस्टपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवा

अनेक मंडळांच्या मूर्ती महिनाभर आधी मंडपात नेल्या जात असल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम 13 ऑगस्टपूर्वी करावे, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीकडून यावेळी करण्यात आली. घाटकोपर स्टेशन परिसरात तब्बल 22 स्पीड बेकर असून तेही खराब आहेत. त्यामुळे स्पीड ब्रेकरची डागडुजी तातडीने करावी, रंगकाम करावे अशी मागणीही  करण्यात आली. स्वस्त दरात वीज मिळावी हा मुद्दाही मांडण्यात आला.