अदानी पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

अदानी समूहावरील आरोपांचा कसून तपास सुरू असून ही कंपनी पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. तपासात अनेक मोठी नावेही समोर येत असून देशाच्या लेखा नियामकाकडून अदानी समूहाच्या दीर्घकालीन ऑडिटरची चौकशी सुरू झाली आहे. नियामकाने बंदी घातलेल्या एस.आर फर्मकडून अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या ऑडिटशी संबंधित फाईल्स मागितल्या आहेत. दरम्यान, ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार अकाऊंटिंग रेग्युलेटर नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अॅथॉरिटीने अदानी समूहाच्या कामांचे ऑडिट करणाऱ्या एस. आर बाटलीबायवर बंदी घातली आहे.

नियामकाने गौतम अदानींच्या नियंत्रणाखाली असलेल्या काही कंपन्यांशी संबंधित फायली मागवल्या आहेत. 2014 पर्यंतच्या तारखांशी संबंधित फायलींची मागणी केली असून याप्रकरणी अदानी समूह, अकाऊंटिंग रेग्युलेटर नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अॅथॉरिटी किंवा ईवाय, एनएफआरए किंवा एस. आर बालटीबाय कंपनीकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

अदानीच्या पाच कंपन्यांचे ऑडिट
अदानीमागे दीर्घकालीन चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. अदानीशी संबंधित एस.आर. बाटलीबाय कंपनीने अदानी समूहाच्या पाच कंपन्यांचे ऑडिट केले असून या कंपन्यांचे उत्पन्न समूहाच्या एकूण उत्पन्नाच्या निम्मे आहे. जानेवारीमध्ये समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबतही नियामक गंभीर असल्याचे समोर आले आहे.

हिंडनबर्गच्या अहवालात काय आरोप?
हिंदुस्थानी कायद्यानुसार परदेशी अकाऊंटिंग फर्म्स ऑडिटर म्हणून नोंदणी करू शकत नाहीत. असे असताना ईवायसह बड्या चार कंपन्या स्वतंत्रपणे काम करणाऱ्या असोसिएट्सद्वारे ऑडिटचे काम करत असल्याचे समोर आले. हिंडनबर्गच्या अहवालात ऑडिट आणि ऑडिटर्सबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. एकेकाळी समूहाचे एकूण भाग भांडवल 150 अब्ज डॉलर्सने घसरले होते.