कर्नाटकातही ‘अजित पवार’! काँग्रेसचे सरकार वर्षभरात पडेल, कुमारस्वामी यांचा दावा

महाराष्ट्रासारखी राजकीय परिस्थिती कर्नाटकातही निर्माण होत आहे. कर्नाटकातही ‘अजित पवार’ लवकरच निर्माण होईल आणि काँग्रेसचे सरकार वर्षभरात पडेल, असा दावा जेडीएसचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.

2019 मध्ये माझे सरकार पडेल असा विचार कोणी केला नव्हता. पण ते पडले. महाराष्ट्रात देखील असेच घडले आहे. महाराष्ट्रातील घडामोडीनंतर मला भिती वाटते कर्नाटकातील अजित पवार कोण असेल? कर्नाटकात अशी गोष्ट होण्यास वेळ लागणार नाही. कर्नाटकातील काँग्रेस सरकार एका वर्षाच्या आत पडेल, असे कुमारस्वामी म्हणाले. कर्नाटकातील ‘अजित पवार’ कोण? हे मी येथे सांगणार नाही; पण ते लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.