लोकसभेच्या धामधुमीत अपक्षांनी बॉम्ब टाकला; काँग्रेसला दिला पाठिंबा; हरयाणातील भाजप सरकार अल्पमतात

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हरयाणात भाजपवर अपक्षांनी आज बॉम्ब टाकला. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. सैनी सरकारची साथ सोडणाऱया या आमदारांनी कॉँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केल्याने ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे.

हरयाणात दोन महिन्यांपूर्वी मनोहरलाल खट्टर यांना मुख्यंमत्री पदावरून हटवून नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्य सरकारचे नेतृत्व सोपवले होते. खट्टर यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. नेतृत्वबदल होऊन दोन महिने झालेले असतानाच अपक्ष आमदार रणधीर गोलन, धर्मपाल गोंदर, सोमवीर सांगवान यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन हरियाणात भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली.

सरकारच्या धोरणांवर आपण खूश नसल्यामुळे भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे या तिन्ही अपक्ष आमदारांनी सांगितले. दरम्यान, या तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणातील बहुमताचे गणित बिघडले आहे.

भाजपची नजर जेजेपीच्या नाराजांवर

हरियाणातील या राजकीय गोंधळात जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार किंगमेकर ठरू शकतात. जेजेपीचे 10पैकी 7 आमदार सध्या त्यांच्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपची नजर या नाराजांवर असून सत्ता वाचवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

भाजप-जेजेपीमध्ये वाद

हरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजप आणि जेजेपीने युती करून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत भाजपला 41 तर जेजेजीला 10 जागा मिळाल्या. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जेजेजीला बाजूला केले आहे.

असे आहे बलाबल

90 जागांच्या हरयाणा विधानसभेत बहुमताचा आकडा 46 आहे. भाजपकडे 41 आमदार असून त्यांना 6 अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता. यापैकी तिघांनी आता पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे आता हरयाणातील सैनी सरकारकडे फक्त 44 आमदार शिल्लक आहेत.