हरमनप्रीतवर दोन सामन्यांची बंदी, पंचांच्या निर्णयावरची नाराजी आणि बांगलादेशी कर्णधारावर केलेली टीका पडली महागात

बांगलादेशविरुद्ध ढाक्यात खेळल्या गेलेल्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात पंचांच्या निर्णयाविरुद्ध व्यक्त केलेली नाराजी आणि बांगलादेशी कर्णधार नागिर सुल्तानवर केलेली टीका हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगलीच महागात पडली आहे. आयसीसीने हरमनप्रीतच्या गैरवर्तनाची गांभीर्याने दखल घेत तिला दोन वेगवेगळ्या उल्लंघनासाठी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन सामन्यांची बंदी लादली आहे. यामुळे तिला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे.

डावातील 34 व्या षटकांत नाहिदाच्या फिरकीवर स्लिपमध्ये हरमनप्रीतला झेलबाद दिल्यामुळे तिने आपली नाराजी व्यक्त करताना स्टम्पवर बॅट मारली. आचारसंहितेच्या लेवल-2 च्या उल्लंघनासाठी हरमनप्रीतवर 50 टक्के मानधनाच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पंचांच्या निर्णयाविरुद्ध असहमती व्यक्त करताना खेळाडूंवर अवाजवी टीका केल्याप्रकरणी आयसीसीच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.8 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी करार करण्यात आले आहे. तिने आपल्यावर केलेले आरोप स्वीकारल्यामुळे सामनाधिकारी अख्तर अहमद यांनी तिच्यावर दोन सामन्यांची बंदी लादली आणि तिने या शिक्षेला सहमतीही दर्शवली.

नेमकं घडलं काय?

तिसऱया एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत 21 चेंडूंत 14 धावा करून बाद झाली. नाहिदा अख्तरने तिला फहिमा खातूनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. परंतु हरमनप्रीतने या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पॅव्हेलियनला जाताना स्टम्पवर आपली बॅट मारली. एवढेच नव्हे तर तिने आपल्या देहबोलीतून पंचांवरही थेट नाराजी व्यक्त केली. मग सामना संपल्यानंतर बक्षीस वितरणाप्रसंगी पंच आणि बांगलादेश क्रिकेटबद्दल आक्षेपार्ह विधान केले. हे विधानच तिच्या अंगलट आले आणि तिला या विधानासाठी आणि बाद झाल्यानंतर केलेल्या गैरवर्तनासाठी मोठी किंमत मोजावी लागली. हरमनप्रीतच्या डोक्यात इतका राग होता की, तिने बांगलादेशी कर्णधार नागिर सुल्तानवरही अवास्तव टीका केली. एवढीच नव्हे तर जेतेपदाचा करंडक विभागून देताना दोन्ही कर्णधारांना बोलावले तेव्हाही हिंदुस्थानी कर्णधाराच्या नजरेत आग दिसत होती.