हिंदुस्थान नॉनस्टॉप, नेपाळचा 133 धावांनी उडवला धुव्वा; आता उपांत्य फेरीत आफ्रिकेशी गाठ

हिंदुस्थानच्या युवा संघाने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना आज नेपाळचा 133 धावांनी धुव्वा उडवला आणि 19 वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश मिळविला. येत्या 6 फेब्रुवारीला हिंदुस्थानचा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाईल तर ऑस्ट्रेलिया उद्या पाकिस्तान-बांगलादेश लढतीतून उपांत्य फेरी गाठणाऱया संघाशी 8 तारखेला भिडतील.

आजचा सामना औपचारिकता पूर्ण करणारा होता आणि तसेच झाले. हिंदुस्थानच्या तीन फलंदाजांना 62 धावांत बाद करून नेपाळने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी चौथ्या विकेटसाठी 215 धावांची जबरदस्त भागी रचत हिंदुस्थानला त्रिशतकासमीप नेले. दोघांनीही वैयक्तिक शतके झळकावत वर्ल्ड कपमध्ये शतकांची मालिका सुरूच ठेवली. उदयने 100 धावा काढल्या तर धसने 116 धावांची लाजबाव खेळी केली.

हिंदुस्थानचे 298 धावांचे आव्हान नेपाळला पेलवलेच नाही. ते केवळ मैदानात खेळायला उतरले होते. त्यांच्या एकाही फलंदाजाने धावांचा पाठलाग करण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात नेपाळने 50 षटके फलंदाजी करत 165 धावा केल्या. हिंदुस्थानच्या सौमी पांडेने 29 धावांत 4 विकेट घेतल्या.

विंडीज बाद आणि आफ्रिका उपांत्य फेरीत

ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होतेच, पण आज ऑस्ट्रेलियाला हरवून विंडीजला उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाने 8 बाद 227 अशी मजल मारली, पण विंडीज 2 बाद 24 अशा स्थितीत असताना पावसामुळे खेळ थांबला आणि सामना पुन्हा सुरूच होऊ शकला नाही. त्यामुळे विंडीजचे आव्हान संपुष्टात आले तर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 119 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.