जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक; 2 दहशतवादी अडकले जाळ्यात

जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुरक्षा घेऱ्यातून पळून गेलेले दोन दहशतवादी  गुरुवारी कुलगाम जिल्ह्यातील पुन्हा जाळ्यात अडकल्याची माहिती मिळते आहे.

एका ट्विटमध्ये, कश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं की, शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम भागात गोळीबार सुरू झाला आणि शोपियान पोलीस, हिंदुस्थानी लष्कर आणि सीआरपीएफचे जवान ड्युटीवर होते.

‘शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम भागात चकमक सुरू झाली आहे. शोपियान पोलीस, लष्कर आणि CRPF शोध घेत आहेत. पुढील माहिती थोड्यावेळात दिले जातील’, असं कश्मीर झोन पोलिसांनी X वर पोस्ट केलं आहे.

कुलगाम जिल्ह्यातील हदीगाम गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या दोन दिवसांनी शोपियानमधील घटना घडली आहे. पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती.

कुलगाममध्ये कोणत्याही ताज्या गोळीबाराची घटना झालेली नाही. परंतु दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलं, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली.