बलात्कार पीडित अशीलावर वकिलाचा अत्याचार,सल्लामसलतीच्या नावाखाली आई-वडिलांना बाहेर बसवून अब्रू लुटली

केरळ पोलिसांनी उच्च न्यायालयातील सरकारी वकील पीजी मनू याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. बलात्कार पीडितेवरच बलात्कार केल्याचा मनू याच्यावर आरोप आहे. पीडितेने आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाची वाच्यता केल्यापासून मनू फरार झाला आहे. उच्च न्यायालयाने मनूला आत्मसमर्पण करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती, मात्र तो न्यायालयात हजर झाला नाही. सदर प्रकरण हे ऑक्टोबर 2023 महिन्यातील असून 25 वर्षीय बलात्कार पीडिता मनूकडे कायदेशीर सल्ल्यासाठी आली होती. तिच्यावर 2018 साली बलात्कार झाला होता. मनू याने पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा उचलत दीड महिन्यात तीन वेळा बलात्कार केला. मनूविरोधात लुकआउट नोटीस जारी करत मनू देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आहेत.

आई-वडिलांना बाहेर बसवून ठेवत बलात्कार

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, 9 ऑक्टोबर रोजी ती तिच्या आई-वडिलांसह केरळमधील कडवंथरा येथील मनूच्या कार्यालयात गेली होती. यावेळी मनूने चर्चा करायची आहे असे सांगून तिच्या आईवडिलांना बाहेर बसायला सांगितले. यानंतर त्याने दार बंद करून घेत पीडितेवर बलात्कार केला. पीडितेने त्याला विरोध असता मनूने तिला 2018 सालचा खटला उलटवून टाकू तुलाच या प्रकरणात आरोपी बनवू अशी धमकी दिली होती. मनूने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ देखील काढले होते. या फोटो, व्हिडीओंच्या आधारे त्याने 11 ऑक्टोबरला पीडितेवर पुन्हा बलात्कार केला होता. 24 नोव्हेंबर रोजी पीडितेच्या घरी कोणी नसताना मनू तिच्या घरात घुसला होता. यावेळीही त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने म्हटले आहे.