खलिस्तानवाद्यांनी हिंदुस्थानचा दूतावास पेटवला

अमेरिका, कॅनडामध्ये खलिस्तानवादी समर्थकांनी पुन्हा डोके वर काढले असून रविवारी सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानची महावाणिज्य कचेरी पेटवून देण्याचा प्रयत्न या समर्थकांनी केला. गेल्या पाच महिन्यांतील हा दुसरा हिंसक प्रयत्न असून अमेरिकन सरकारने याचा तीव्र निषेध करत गुन्हेगारी घटना अशी या जाळपोळीची संभावना केली आहे.

कॅनडामध्येही खलिस्तानवाद्यांनी एका मोर्चात हिंदुस्थानी राजनैतिक अधिकाऱयांना ‘खुनी’ असे संबोधणारे फलक फडकवल्यानंतर हिंदुस्थानने नवी दिल्लीत कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱयांना बोलावून याचा तीव्र निषेध केला. या वेळी या राजनैतिक अधिकाऱयांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असल्याची ग्वाही कॅनडाने दिली.

गेल्या महिन्यात व्हँकुवर येथे टोळीयुद्धात मारला गेलेला शीख दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येसाठी हिंदुस्थानला दोषी मानून शीख अतिरेक्यांनी अमेरिकेतील हिंदुस्थानी राजदूत आणि महावाणिज्यदूत यांची नावे असणारे फलक ऑनलाईनही पसरवले होते. काँग्रेसने सॅन फ्रान्सिस्को हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोरांना शिक्षा होईल आणि हिंदुस्थानची राजनैतिक कार्यालये सुरक्षित राहतील यासाठी केंद्राने संबंधित देशांशी योग्य पावले उचलण्यासाठी समन्वय साधावा, असे म्हटले आहे.