‘सौर कृषी योजने’ला गायरान जमीन देण्यास ‘किणी’करांचा विरोध

‘मुख्यमंत्री सौर कृषी योजने’साठी किणी येथील गायरान जमिनीची मोजणी करण्यास आलेल्या शासकीय अधिकाऱयांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. सदरची मोजणी तहकूब करण्यास भाग पाडले. शासकीय गायरान जमीन ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली महावितरणच्या आडाने उद्योजकांना कवडीमोल मोबदल्यात देण्याचा मिंधे सरकारचा घाट आम्ही चालू देणार नसल्याची भूमिका किणी ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये घेतली.

महावितरण कंपनीने ग्राहकांच्या मागणीचा भविष्यकाळातील विचार करून सौरऊर्जा प्रकल्पावर भर दिला आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 पर्यंत सुमारे आठ हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचे धोरण अवलंबले आहे. 2023 अखेरपर्यंत वीजनिर्मितीचा करार करण्यात आला आहे. त्यापैकी 600 मेगावॅट वीज कार्यान्वित झाली आहे. उर्वरित विजेची पूर्तता करण्यासाठी कोल्हापूर जिह्यातील दहा किलोमीटर अंतरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.

रविवारी किणी येथे महावितरण, भूमिअभिलेख, महसूल विभागाचे अधिकारी येथील हत्ती माळ व हंजेमळा येथील जमीन मोजणी करण्यासाठी आले असताना किणी ग्रामस्थांनी सदर जमीन मोजणी करण्यास तीव्र विरोध केला. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्य़ा यामध्ये हत्ती माळ येथील दहा हेक्टर गायरान जमीन ही भविष्यकाळात सार्वजनिक ऊपक्रम व गावाच्या विस्ताराकरणासाठी उपयुक्त असल्याने तसेच या ठिकाणी भूमिहीन बेघरांना गृहप्रकल्पासाठी ही जमीन आवश्यक आहे.

हंजे मळा येथील गायरान हे दसऱयाच्या पालखीचा मार्ग असल्याने या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास पालखी प्रदीर्घ काळ थांबते. त्यानंतर पुढील मिरवणुकीला सुरुवात होते तसेच घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी, दफनभूमी या ठिकाणी आहे. त्यामुळे या गायरान जमिनीची ग्रामपंचायतीला गरज आहे. त्यामुळे दोन्ही गायरान जमिनी कुठल्याही परिस्थितीत देणार नाही, यासाठी जनआंदोलन उभे करू तसेच न्यायालयीन लढाही उभारू, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱयांनी सामंजस्याची भूमिका स्वीकारून आलेली मोजणी स्थगित केली.

यावेळी उद्योजक संजय पाटील, सरपंच सुप्रिया समुद्रे, उपसरपंच अशोक माळी, बाळासा पाटील, महावीर पाटील, दीपक घाटगे, अजित पाटील, जयकुमार पाटील, नंदकुमार माने, तलाठी श्रीमती मोमीन, मोजणी अधिकारी राहुल पाटील यांच्यासह किणीमधील ग्रामस्थ व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.