बळीराजावर आभाळ कोसळले..हजारो हेक्टर शेतीचा चिखल; कोकण, विदर्भ, मराठवाडय़ाला पुराचा तडाखा

 

 

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, कोकण, मराठवाडय़ासह उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिह्याला ‘कोसळ’धारेने अक्षरशः झोडपून काढले असून बळीराजावर आभाळ कोसळले आहे.  मान्सून सर्वदूर पोहोचण्याची वर्दी मिळाल्यानंतर बळीराजा आनंदून गेला होता. खरीप हंगामातील पेरण्या वेगाने झाल्या. मात्र, वरुणराजाने या पेरण्यांवर ‘पूर’ फेरल्याने हजारो हेक्टर शेतीचा चिखल झाला. कर्ज काढून लावलेले बियाणे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे दडपून गेले. आता कर्जाचा डोंगर फेडायचा कसा, बँकांच्या, सावकाराच्या फेऱयातून सुटका करून घ्यायची कशी, अशा अनेक प्रश्नांचे काहूर बळीराजाच्या मनात माजले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहुणचार करून घेण्यात मश्गूल होते.  यामुळे विरोधकांमध्ये प्रचंड संताप असून या संतापाचा उद्रेक उद्या पावसाळी अधिवेशनात होणार आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ जिह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. यवतमाळ जिह्यात मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा अनिल पाटील यांनी केली. तसेच 1 हजार 600 हून अधिक पूरग्रस्त कुटुंबीयांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. दरम्यान, 13 जुलैपासून आतापर्यंत मुसळधार पावसामुळे गडचिरोली आणि बुलढाणा जिह्यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला, तर वर्धा आणि गोंदियात प्रत्येकी 2 आणि चंद्रपुरात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

तीन दिवसात प्रचंड पाऊस

गेल्या दोन ते तीन दिवसांत 15 ते 20 दिवसांचा पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि एसडीआरएफ अर्थात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून तातडीचे बचावकार्य करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पुढचे तीन ते चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

संपूर्ण विदर्भ आणि पूर्व मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली, नांदेड जिह्यात यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

कोल्हापूरचा कोकणाशी संपर्क तुटला

कोल्हापूर जिह्यातही पावसाचे थैमान असून गगनबावडामार्गे कोल्हापूरचा कोकणाशी संपर्क तुटला आहे. मांडूकली, गवळी पूल पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱयाची पातळी 37 फुटांवर पोहोचली असून जिह्यातील एकूण 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिह्याला पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अकोल्यात 150 दुकाने बुडाली

अकोल्यात शहराच्या मध्यभागी असलेला किराणा आणि धान्याचा घाऊक बाजार राष्ट्रीय महामार्गावर हलविण्यात आला आहे. बाजारात 250 हून अधिक दुकाने असून 150 दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यात तब्बल 10 ते 12 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱयांनी वर्तविला आहे.

जळगावात 250 मिमी पाऊस, तरुण बेपत्ता

जळगाव जिल्हय़ात 22 जुलैपर्यंत तब्बल 250 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. रावेर तालुक्यात नद्या, नाल्यांना पूर आला असून मुक्ताईनगरचा संपर्क तुटला आहे. रावेर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. मात्रण, नागझिरी, सुकी, आदी नद्यांना पूर आला असून नागोई नदीच्या पुरात विरोदा रस्त्याच्या पुलाला भगदाड पडल्यामुळे स्मशानभूमी आणि विरोद्याचा संपर्क तुटला. पाल-खिरोदा, कुसुंबा-लाहोरा, उटखेडा-कुंभारखेडा येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. सुकी नदीला पूर आला आहे. रोझोदा येथील रवींद्र चौधरी ऊर्फ महेंद्र कोळी हा सुकी नदीपात्रात शुक्रवारी पोहायला गेला होता. तो अचानक बेपत्ता झाला असून एसडीआरएफकडून त्याचा शोध सुरू आहे.

 

विदर्भात 16 जणांचा मृत्यू,54 हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे गेल्या 10 दिवसांत  विदर्भात विविध भागांत 16 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 54 हजार हेक्टर शेतीचा चिखल झाला आहे. यात 53 हजार हेक्टर शेती एकटय़ा अमरावती जिह्यातील आहे. यवतमाळ तसेच अमरावती जिह्यातील 2 हजार 796 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा येथे मुसळधार पावसाने दैना करून टाकली. 

अमरावतीत 2882 घरांचे नुकसान

अमरावतीमध्ये 53 हजार 56 हेक्टर शेतजमिनीचा चिखल झाला असून एकूण 2 हजार 882 घरांचे नुकसान झाले. यात 1 हजार 432 यवतमाळ, 1,424 अकोला, वाशिममधील 14 तर अमरावतीतील 12 घरांचा समावेश आहे. सहा तालुक्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून यात कापूस, तूर आणि सोयाबीनचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. तर एकूण 59 जनावरांचा मृत्यू झाल्याचे अमरावती जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. अद्याप यवतमाळमध्ये 110 नागरिक पुरात अडकले असून बुलढाण्यात कातरगाव येथील 100 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

रत्नागिरीत तीन नद्या इशारा पातळीवर

कोकणात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिह्यात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच खेडमधील जगबुडी नदी, संगमेश्वरमधील शास्त्राr नदी, राजापुरातील कोदवली नदी या तीन नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे कुडासे वानोशी येथे घराची भिंत कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यात बमू वरक (65) ही वृद्ध महिला जखमी झाली.

नांदेड जिह्यात पैनगंगेला पूर

नांदेड जिह्यात किनवट व माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीला पूर आला होता. माहूर तालुक्यातील टाकळी शिवारातील तिघांची पुराच्या पाण्यातून 24 तासांनंतर सुटका करण्यात आली. किनवटमधून उमरखेडला जाणाऱया खबरी पुलावरून पाणी वाहत होते. नालागड्डा, मोमीनपुरा, गंगानगर व रामनगरच्या 80 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 176 गावांतील 13,246 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले.