दीर्घायू भव : पनीरचे लाभ

>> वैद्य सत्यव्रत नानल

पनीर माहीत नाही अशी माणसे अख्ख्या जगात सापडणे अवघडच. पनीर कसे खावे, फायदे काय याबद्दल आज आयुर्वेदाचे मत आपण पाहू.

पनीर म्हणजे पौष्टिकता, पोषणाने भरपूर असा पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. जे मांसाहार करत नाहीत ते पनीरवर ताव मारून त्यांची गरज भागवतात. पालक पनीर, मटर पनीर, पनीर कुर्मा, बटर पनीर असे अनेक पदार्थ सध्या देशभरात सर्व ठिकाणी मिळतात. या सर्व पदार्थांना खाल्ल्याने अपचन, अम्लपित्त, अजीर्ण असे अनेक प्रकार होतात हे लोकांना चांगलेच माहीत आहे. तरीही जिभेचे चोचले पुरवण्याच्या अट्टाहासापायी आरोग्याचा जीव घेणे सुरूच राहते. यामुळेच पनीर खात नाहीत, आवडत नाही, पचत नाही, खाल्ले तर त्रास होतो अशा तक्रारी करणारेसुद्धा भरपूर आढळणे सुरू झाले आहेत.

कसे बनवायचे…

दूध थोडे कोमट करून त्यात आंबट पदार्थ म्हणजे लिंबूरस वगैरे घालून दूध फाडले जाते. त्यानंतर त्यातील चोथा दाबून पाणी वेगळे केले जाते. ही पनीर बनवण्याची सामान्य पद्धत आहे.

कुणी खाऊ नये?

अपचन असलेल्यांनी खाऊ नये.
भूक कमी असलेल्यांनी खाऊ नये.
पावसाळय़ात खाऊ नये.
कफाचे रोग, विविध ठिकाणी होणाऱ्या गाठी, (सिस्ट, फायाब्रोईड वगैरे) रोग यामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने खावे.
व्यायाम न करणाऱ्यांनी नियमित वापरू नये.
मलविबंध, मलावरोध असेल तर खाऊ नये.

कसे वापरावे…

नास्कवणी : दूध फाटल्यावर चोथा पाणी तयार होते. त्यातून पाणी आणि पनीर वेगळे न करता तसेच घेऊन त्यात कोमट असताना साखर किंवा गूळ घालून खाता येते. थंड करून खायचे असेल तर मध घालून खावे. याला कोकणात नास्कवणी म्हणतात. अत्यंत पोषक, परंतु पचनास पनीरपेक्षा हलके असते. शरीर घटकांचे त्वरित पोषण करते. पोट साफ करते. आतडय़ाची शक्ती वाढवते.

अतिस्त्रीगमनवृत्ती असेल तर शुक्रधातू क्षिणता असते. शरीराचा कसच कमी होतो. कंबर, मांडय़ातील शक्ती कमी वाटते. शरीरावरील मांस शिथिल होते किंवा जोरकस राहात नाही. नैराश्य येते, चिडचिड सुरू होते. अशावेळी पनीर तुपावर परतून घ्यावे. थंड झाल्यावर त्यावर मध एक चमचा आणि वेलची किंवा लवंग पूड दोन चिमूट घालावी आणि रोज 10 ते 20 ग्रॅम खावे. एक-दोन महिने केल्यावर फायदा दिसू लागतो.

अतिमद्यपानामुळे शरीर सुकले असेल तर तुपावर 20 ग्रॅम पनीर परतून त्यासह खजूर, मनुकांची चटणी करून रोज नाश्त्यासह खावे.

जे नियमित व्यायाम करतात, पण अंगावर मांस पाहिजे तसे न वाढता सुकलेलेच राहते, त्यांनी पनीर, लोणी, तूप, दही नियमित खावे. त्यांचे नियम वैद्यांना विचारून घ्यावेत. रोज 20 ग्रॅम पनीर तुपात तळून साखरेच्या पाकात बुडवून खावे. वर ताक प्यावे.

ज्यांना भरपूर भूक लागते, खूप खा खा सुटते अशांनी पनीर तुपात तळून ते साय साखरेच्या मिश्रणात बुडवून खावे. वैद्यांना भेटून पोटात जंत नाहीत असे निदान केल्यावर हा त्रास असेल तर हा उपाय करावा.

झोप न लागणे, झोपेत भरपूर स्वप्न पडणे, तुटक झोप लागणे अशा तक्रारींसाठी म्हशीच्या दुधाचे पनीर रात्रीच्या जेवणात थोडे खावे. ज्यांना वजन वाढणे, दमा, कफाचे रोग असतील त्यांनी हा उपाय करू नये. त्यांनी आधी सांगितलेली नास्कावणी खावी.

वेगवेगळय़ा भाज्या आणि पनीर थोडय़ा तुपावर किंवा तेलावर परतून नाश्त्यामध्ये किंवा जेवताना भुकेच्या किमान एक तृतीयांश भाग येवढे खावे. सोबत मुगाचे गरम सूप वगैरेही घ्यावे. आरोग्य आपोआप सुधारते.

 [email protected]