मुंबई विमानतळावर प्रवाशांचा वेळ वाचणार, सिक्युरिटी चेक पॉइंट वाढवले

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. विमानतळावर येणाऱया प्रवाशांची तपासणी जलदगतीने व्हावी म्हणून प्रशासनाने येथे सिक्युरिटी चेक पॉईंट्स वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई विमानतळावर आतापर्यंत मर्यादित सिक्युरिटी चेक पॉईंट होते. त्यामुळे प्रवाशांना चेक इन साठी रांगा लावाव्या लागत होत्या. सदरची गैरसोय टाळण्यासाठी विमानतळाने प्रशासनाने पायाभूत सुविधांच्या वाढीसह, आता एकूण 5 हजार 735 चौरस मीटर सुरक्षा तपासणीचे क्षेत्र केले आहे. त्यामुळे ते देशातील सर्वात मोठे सुरक्षा चेक पॉईंट बनला आहे.

यात आठ नवीन सुरक्षा मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. विमानतळावरील प्रवेशाच्या प्रक्रियेची क्षमता वाढवण्यासाठी, प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी आणि सुरक्षेच्यादृष्टीने चेक पॉईंट वाढवले आहे. त्यामुळे टर्मिनल दोनवर येणाऱया प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान नवीन सुरक्षा चेक पॉईंटवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गुडनेस चॅम्पियन्स (सर्व्हिसेस स्पेशलिस्ट) तैनात करण्यात आले आहेत. ते ज्येष्ठ नागरिक, लहान मुले सोबत असलेल्या प्रवाशांना, दिव्यांगांना सुरक्षा चेक पॉईंटवर मदत करणार आहेत.