…म्हणूनच करकरेंच्या मृत्यूबाबत रहस्य निर्माण केले जाते

हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक पोलीस अधिकाऱयाच्या गोळीने झाला असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते त्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही आज त्यावर प्रतिक्रिया दिली. हेमंत करकरे यांचा त्यावेळी आरएसएसबरोबर संघर्ष सुरू होता, त्यामुळेच त्यांच्या मृत्यूबद्दल रहस्य निर्माण केले जाते, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, “हेमंत करकरे देशासाठी शहीद झाले. त्यांना कसाबची गोळी लागली की दुसऱया कोणाची हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी करकरे एटीएसचे प्रमुख होते. त्यांचा मृत्यू रहस्यमय होता असे मी मानत नाही. त्यावेळी अनेक पोलीस अधिकारी शहीद झाले. ते देशाच्या शत्रूंविरुद्धचे मोठे युद्ध होते.’’

“आरएसएस आणि करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल चर्चा सुरू झाल्या असे माझे वैयक्तिक मत आहे. साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित हे आरएसएसशी संबंधित लोक होते. दुसरे स्वामी दयानंद होते. रमेश उपाध्याय होते. मी त्या केसवर अभ्यास करत होतो. माझ्याकडे त्यावेळी बरेच लोक, विशेष करून आरएसएसचे लोक यायचे. करकरे यांनी चुकीच्या पद्धतीने साध्वी प्रज्ञा आणि पुरोहितवर कारवाई केली असे ते सांगायचे. पुरोहितचे कुटुंबीयही त्यावेळी माझ्याकडे आले होते. त्यामुळेच करकरेंच्या मृत्यूबद्दल ही थिएरी समोर आली असावी’’ असे संजय राऊत म्हणाले.

वडेट्टीवार यांना विचारण्यापेक्षा हसन मुश्रीफांना प्रश्न विचारा

विजय वडेट्टीवार यांनी आपण केलेले वक्तव्य हे पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकातील संदर्भावरून केले आहे असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही माध्यमांतून वडेट्टीवार यांनाच सवाल केले जात आहेत. त्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “वडेट्टीवार यांचे नाव का घेताय. ‘हू किल्ड करकरेहे पुस्तक वाचा. सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस. एम. मुश्रीफ यांनी ते पुस्तक लिहिले आहे. ते त्यावेळी आयजी होते. त्यामुळे प्रश्न हसन मुश्रीफांना विचारला पाहिजे. तुमच्या भावाने ते पुस्तक का लिहिले? तुमचा संबंध काय?’’