शरद पवार आणि गौतम अदानींची अहमदाबादमध्ये भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी दाखल झाले आहेत. अदानींच्या घरातील एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शरद पवार त्यांच्या घरी पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

शनिवारी सकाळी शरद पवार अहमदाबाद येथे पोहोचले. अहमदाबाद विमानतळावरील त्यांचा एक फोटो व्हायरल झाला असून यात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही दिसत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते.

दरम्यान, शरद पवार यांनी दुपारी अडीचच्या सुमारास एक ट्विट केले आहेत. यात ते उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत दिसत आहेत. गौतम अदानी यांच्यासोबत गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील वसना, चाचरवाडी येथील देशातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हा बहुमान होता, असे कॅप्शन पवारांनी या फोटोला दिले आहे.

नवभारत टाइम्स‘ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील एका व्यवसायिकाने अहमदाबाद येथे नवीन कंपनी सुरू केली असून या कंपनीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार अहमदाबादला पोहोचले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर पवार अदानींच्या अहमदाबाद येथील घरी गेले. गत एक-दीड वर्षातील दोघांची ही तिसरी-चौथी भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याआधी गौतम अदानी आणि शरद पवार यांची 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात 2 तास चर्चा झाली होती. गौतम अदानी हे हिंडनबर्गच्या अहवालानंतर चर्चेत आले होते, तेव्हा दोघांमध्ये ही भेट झाली होती. यानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची दुसरी भेट 2 जून 2023 रोजी झाली होती, यात दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली होती.