यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई नाही 

ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता काम करणाऱया वृत्तपत्र विक्रेत्यांस महानगरपालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. मात्र यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशी माहिती बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघर्ष समितीतर्फे देण्यात आली आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांवर महापालिकेकडून वारंवार होणाऱया कारवाईच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई संघर्ष समितीचे पदाधिकारी मधू माळकर, संजय सातार्डेकर व महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी दत्ता घाडगे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या मांडल्या होत्या. याची दखल घेत पालिका आयुक्तांच्या आदेशाने बुधवारी पालिकेचे अनुज्ञापन अधीक्षक अनिल काटे, सहाय्यक अनुज्ञापन अधीक्षक अनिल शेवाळे व उप अनुज्ञापन अधीक्षक विजय अडसूळ यांनी पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्त ए टू टी तसेच वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांना वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करू नये असा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही वृत्तपत्र विक्रेत्यावर अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली जाणार नाही.