कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही; दत्ता दळवी भूमिकेवर ठाम

एका सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक शब्द वापारल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी बुधवारी त्यांना अटक केली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दत्ता दळवी यांनी स्पष्ट केले आहे. धर्मवीर चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी ज्या शब्दाता वापर केला, त्याच शब्दाचा आपण वापर केल्याचे दळवी यांनी सांगितले. कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही, आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. हे सूडाचे राजकारण सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.

मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासोबत आपण काम केले आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांनी जो शब्द वापरला आहे, तोच शब्द आपण वापरल्याचे दळवी यांनी सांगितले. आम्ही विरोधात आहोत. जाहीर सभेत जे शब्द वापरायचे असतात, तेच वापरले आहेत. नको ते शब्द किंवा शिवीगाळ केलेली नाही. अपशब्द बोलायचे असते तर आमच्या मालवणीमध्ये अनेक शब्द आणि शिव्या आहेत. त्यामुळे आपण काहीही वावगे बोललो नसून जे बोलायचे आहे, तेच बोललो असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.

हिंदूहृदयसम्राटांचा अपमान केल्याबद्दल एकनाथ शिंदेवर गुन्हा दाखल व्हायला हवा, संजय राऊत यांचे संतप्त उद्गार

दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड
काही अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. एका सभेत मुख्यमंत्र्यांबाबत काही शब्द वापरल्याने दळवी यांना पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केला. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या सर्व घटना घडत असताना दत्ता दळवी यांच्या गाडीची काही अज्ञातांनी तोडफोड केली आहे. अशी तोडफोड करणाऱ्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत, त्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.