अदानी समूहाने 32 हजार कोटींचा कोळसा घोटाळा केला, राहुल गांधींचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी एक वृत्त अहवाल सादर केला, ज्यात बनावट बिले आणि विदेशी कंपन्यांची नावे वापरून आयात कोळशाच्या किमती फुगवण्यात आल्या आणि लाखो ग्राहकांच्या माथी या कोळशातून निर्माण झालेली वीज अव्वाच्या सव्वा दराने मारण्यात आली, असे म्हटले आहे. अदानी समूहाला केंद्र सरकारचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आरोपानंतरही अदानी समूहाची चौकशी केली जात नाही, ही चौकशी का होत नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की पहिले आम्ही अदानी समूहावर 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. हा पैसा कोणाचा आहे आणि तो कुठून आला आहे असा आम्ही प्रश्न लिचारला होता. मात्र आता आम्हाला जी माहिती मिळाली असून 20 हजार कोटींचा आकडा चुकीचा असून तो प्रत्याक्षात 32 हजार कोटी आहे. राहुल गांधी यांनी अदानी समूहावर आरोप करताना म्हटले की, अदानी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात आणि हिंदुस्थानात दुप्पट दराने विकतात. लोकांनी विजेचा स्विच ऑन करताच पैसा अदानींच्या खिशात जायला सुरुवात होते असे राहुल यांनी म्हटले. अदानी यांना पंतप्रधान मोदी हे संरक्षण देत असल्याचाही राहुल यांनी पुन्हा आरोप केला.

जर शरद पवार पंतप्रधान असते तर….
अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी होत असतात. याबाबत प्रश्न विचारला असता राहुल यांनी म्हटले की, शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नाहीयेत आणि ते अदानी यांचा बचाव करत नाहीये. देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत ज्यामुळे मी त्यांनाच प्रश्न विचारत आहे. जर शरद पवार पंतप्रधान असते आणि त्यांनी अदानीचा बचाव केला असता तर मी हाच प्रश्न शरद पवार यांना विचारला असता असे राहुल म्हणाले.