मुख्यमंत्र्यांच्या शहरात नशेची ‘गॅरंटी’; ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर छापा, ड्रग्ज, दारूचा मोठा साठा जप्त

ठाणे शहराला ड्रग माफियांचा विळखा पडला असतानाच आज थर्टी फर्स्टसाठी कासारवडवली परिसरातील खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकला.  ‘दम मारो दम’ करत डीजेच्या तालावर झिंगणाऱ्या  95 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची नशाच उतरवली. त्यात पाच तरुणींचाही समावेश असून दारू, चरस, गांजा, एलएसडी पावडर असा अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

ठाणे शहर व परिसरात गेल्या वर्षभरात ड्रग माफिया हातपाय पसरले आहेत. अनेक ठिकाणी  अमली पदार्थांच्या विक्रीचे अड्डे आहेत. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांच्या समक्ष राजरोसपणे हे धंदे सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. थर्टी फर्स्टसाठी घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे खाडीकिनारी असलेल्या मोकळय़ा मैदानावर तेजस कुबल व सुजल महाजन या दोन तरुणांनी रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी सुरू होण्यापूर्वी केवळ दोन ते तीन तास आधी इन्स्टाग्राम व फेसबुकवरून याबाबतची जाहिरात देण्यात आली. त्यातून ठाण्यासह मीरा रोड, पालघर, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबई भागातील तरुणाईने आपली नावे नोंदवली होती.

खाडीकिनारी असलेल्या निर्जन जागेमध्ये रात्री उशिरा डीजेचा दणदणाट सुरू झाला आणि तरुणाई थिरकू लागली. दारूबरोबरच नशेच्या सर्व अमली पदार्थांचा ‘बंदोबस्त’ करण्यात आला होता. पोलिसांना या रेव्ह पार्टीची टीप मिळताच पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस आयक्त नीलेश सोनावणे, भूषण शिंदे, अविनाश महाजन, पल्लवी ढगे-पाटील आदींच्या पथकाने पहाटे तीनच्या सुमारास धाड टाकली. पोलिसांच्या घेराबंदीने तरुणांची नशाच उतरली. पोलिसांनी 95 जणांना ताब्यात घेतले. या सर्वांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर रात्री उशिरा समज देऊन त्यांना सोडण्यात आले.

आठ लाखांच्या मालासह 29 दुचाकी ताब्यात

पोलिसांनी थर्डी फर्स्टच्याच दिवशी केलेल्या या कारवाईत चरस, एलएसडी, नशेच्या काही गोळ्या, गांजा, दारू, ई-सिगारेट असा 8 लाख, 3 हजार 560 रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यात डीजेच्या साहित्याचाही समावेश आहे. 29 दुचाकीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या. दरम्यान ज्या दोन तरुणांनी या पार्टीचे आयोजन केले त्यांची  व जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

तज्ञांनी केले समुपदेशन

नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तरुणांच्या पालकांनादेखील पोलिसांनी बोलावले. पालक व तरुण यांचे तज्ञ व्यक्तींमार्फत समुपदेशन केले गेले. यापुढे आपण अशा पाटर्य़ांमध्ये सहभागी होणार नाही, असे लेखी हमीपत्र घेतल्यानंतरच सर्वांची सुटका करण्यात आली.

नालासोपाऱ्यातही दीड कोटीचे ड्रग्ज

नालासोपाऱ्यातही थर्टी फर्स्टसाठी ड्रग्ज विकण्याकरिता आलेल्या दोघा नायजेरियन नागरिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिवाईन चुकवुमेका आणि चिकवू फ्रेडीनंद ओकितो नवमारी अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून 1 कोटी 47 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यात मॅफेड्रिन व कोकेनचा समावेश आहे. नालासोपाऱ्यातील प्रगतीनगर परिसरात तुळींज पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिह्यात सर्वाधिक रेव्ह पाटर्य़ा – विजय वडेट्टीवार

अमली पदार्थ, ड्रग्जमुळे प्रगतीशील आणि पुरोगामी असे महाराष्ट्र राज्य बुडत चालले आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिह्यात सर्वाधिक रेव्ह पाटर्य़ा होत आहेत. अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिंधे सरकारवर तोफ डागली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर जी पकड होती ती ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यापासून सुटत चालली आहे, असे म्हणत फडणवीस यांनाही वडेट्टीवार यांनी लक्ष्य केले.  एकेकाळी गुंतवणूकदार महाराष्ट्राला पसंती देत, परंतु आता महाराष्ट्र नवव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे,  उद्योग झपाटय़ाने पळवले जात आहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

 ठाण्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे उघड झाले असून मुख्यमंत्र्यांच्या शहरात आता नशेची पक्की ‘गॅरंटी’ आहे काय अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.