दमदाटी कराल तर याद राखा, मला शरद पवार म्हणतात!

तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला. त्यांनाच तू दमदाटी करतोस. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर त्याला सोडतही नाही, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज लोणावळा येथे मेळावा आयोजित केला होता. यावेळी शरद पवार यांचे तुतारी फुंकून आणि जेसीबीद्वारे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. अजित पवार गटातील 100 वर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री मदन बाफना यांनी भाषणात आमदार सुनील शेळके कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. त्यांनी मलाही दम दिल्याचे सांगितले. यावर शरद पवार यांनी आमदार शेळके याचा चांगलाच समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी बारामतीतही अजित पवार गटाकडून दमबाजी होत असल्याच्या तक्रारी होत्या. शरद पवार यांनी आज अप्रत्यक्षपणे अजितदादा गटालाच गर्भित इशारा दिल्याची चर्चा आहे.

अमित शहा यांचा समाचार
देशाचे गृहमंत्री म्हणाले 50 वर्षे महाराष्ट्र शरद पवारांना सहन करत आहे. मी त्यांचा आभारी आहे. 50 वर्षे लोकांनी मला निवडून दिले हे गृहमंत्र्यांनी मान्य केले, असा जोरदार समाचार शरद पवार यांनी अमित शहा यांचा घेतला.

यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, शादान चौधरी, रमेशचंद्र नय्यर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, चंद्रकांत सातकर, नासीर शेख, श्वेता वर्तक, अजिंक्य कुटे, विनोद होगले, अतुल राऊत, भारती शेवाळे, सुरेश चौधरी, दत्तात्रय गोसावी, फिरोज शेख आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधानांची रोज वृत्तपत्रांमध्ये जाहीराती आहेत. जाहिरातींमध्ये मोदींचे गुणगान असते. या जाहिराती कुठून आणि कुणाच्या खर्चाने, कुणाच्या पैशाने दिल्या जातात. देशातील जनतेच्या पैशाने प्रसिद्धी केली जात आहे आणि हे गृहस्थ जनतेला गॅरंटी द्यायला निघालेत कसली गॅरंटी? असे पवार यांनी फटकारले.

मराठी माणसाच्या प्रश्नांची मांडणी ‘सामना’तून
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणसाच्या प्रश्नांची मांडणी ‘सामना’ वृत्तपत्रातून केली जाते. दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत हे खासदार आहेत. ‘सामना’मधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर ते टीका टिप्पणी करतात. टीका केली म्हणून त्यांना 4 महिने तुरुंगात टाकले. लोकशाहीमध्ये लिखाणाचे स्वातंत्र्य आहे की नाही? असा जळजळीत सवाल पवार यांनी भाजपला केला.

… तर सोडतही नाही
शरद पवार म्हणाले, इथले जे आमदार (सुनील शेळके) दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास? तुझ्या सभेला इथे कोण आले होते? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होते? फॉर्म भरायला चिन्ह आणि पक्षाच्या अध्यक्षाची सही लागते ती माझी होती. माझ्या सहीने तू निवडणूक लढलास. तुम्ही आज त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाटी केलीस बस्स. पुन्हा जर असे केले तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही.

केजरीवाल यांना अटक होऊ शकते
देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले आहे. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचने आठवे समन्स धाडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे. केजरीवाल यांना अटक होऊ शकते. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे.

सर्व उमेदवारांची लवकरच निवड करू
महाविकास आघाडीच्या सर्व महत्वाच्या नेत्यांची कालच बैठक झाली. लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करू. आम्ही एकत्र राहून लोकांना पर्याय देऊ. शिवसेनेचे चिन्ह ‘मशाल’ आहे. राष्ट्रवादीची खूण ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आहे आणि काँग्रेसचा ‘पंजा’ आहे. या तिन्ही पैकी ज्याचा उमेदवार इथे असेल त्याच्या पाठीशी शक्ती उभी करा, असे अवाहन पवार यांनी केले.