दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! नगरमध्ये शिवसेनेची दुचाकी रॅली; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून नगरमध्ये समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनांचे पडसाद राज्यभर उमटत असून, अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. दोषी व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. जर शासनाने अशा प्रवृत्तींना रोखले नाही, तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेनेच्या वतीने दुचाकी रॅली काढून निषेध नोंदविण्याचे जाहीर करण्यात आले होते. आज सकाळी शहरातील एस.टी. स्टॅण्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून दुचाकी रॅलीस प्रारंभ करण्यात आला. शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, गणेश कवडे, अनिल बेरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, विजय पठारे, योगिराज गाडे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, बबलू शिंदे, सुरेश तिवारी, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, दत्ता कावरे, संदीप दातरंगे, हर्षवर्धन कोतकर, सुरेश क्षीरसागर, डॉ. श्रीकांत चेमटे, प्रशांत भाले, प्रशांत पाटील, मुन्ना भिंगारदिवे, गौरव ढोणे, रावजी नांगरे, अभिजित अष्टेकर, खेडकर, अरुण झेंडे, लताबाई पठारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांची बदनामी करून शहरात अशांतता माजविण्याचा डाव केला जात आहे. आगामी काळातील निवडणुकीसाठी काही नेते मंडळी विशिष्ट समाजाला हाताशी धरून असे उद्योग करीत आहेत. यात प्रामुख्याने अल्पवयीन मुलांना महापुरुषांबद्दल अपशब्द वापरायला सांगून जातीय तेढ निर्माण करण्यास भाग पाडले जात आहे. असाच प्रकार शनिवारी रात्री मुकुंदनगर भागात घडला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. अशा समाजकंटकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जिल्ह्यातून हद्दपार केलेच पाहिजे. अशा समाजकंटकांवर देशद्रोहाचे कलम लावण्यात यावेत, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.