ठरल्याप्रमाणेच संघनिवड, वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय हिंदुस्थानी संघ जाहीर

आगामी आयसीसी वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानची संघ निवड पूर्वपुण्याईवर झाल्यामुळे ठरल्याप्रमाणेच नाव मोठे असलेले खेळाडू संघात निवडण्याची किमया बीसीसीआय आणि निवड समितीने केली. सध्या फॉर्ममध्ये नसले तरी के. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादवची संघात निवड करण्यात आली असून तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा आणि संजू सॅमसन यांना 15 सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहे.

तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी निवड समिती कोणतेही धाडस दाखवणार नाही हे आधीच स्पष्ट होते. त्यामुळे अंतिम 15 खेळाडू निवडताना फॉर्मपेक्षा नाव मोठे असलेलेच खेळाडू निवडण्याचे संकेत बीसीसीआय अनेक दिवस देत होते. त्यानुसार सहा महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला के.एल.राहुलची निवड करण्याचा जुगार बीसीसीआयने खेळला आहे. त्यामुळे संघाबरोबर राहुल आणि इशान किशन हे दोन यष्टिरक्षक फलंदाज असतील. मात्र या दोघांची निवड करताना संजू सॅमसनवर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे. त्याला संघात कोणतेही स्थान मिळू शकलेले नाही.

हिंदुस्थानचा अष्टपैलू संघ

हिंदुस्थानने निवडलेल्या संघात चार खेळाडू अष्टपैलू आहेत. यात उपकर्णधार हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरचा समावेश आहे. फलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर हे कायम आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचीच निवड केलेली आहे. फिरकीची जबाबदारी कुलदीप यादवसह अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा हे अष्टपैलूही सांभाळतील. यष्टिरक्षणासाठी एक सोडून दोन खेळाडू निवडण्यात आले आहेत. सध्या फॉर्मात असलेला इशान किशनसह फिट होताच संघात स्थान मिळविणारा के. एल. राहुल दोघेही यष्टीमागे दिसतील.

हे तर होणारच होते…

अनफिट असो किंवा फॉर्म नसो तरीही बीसीसीआय राहुलची निवड करणार हे निश्चित होते. त्यानुसार त्यांनी राहुलची निवड केली आणि इशान किशनलाही न्याय दिला. पण यात संजू सॅमसन बळीचा बकरा ठरला. वन डेत सूर्यकुमारला आपल्या फलंदाजीचा झंझावात दाखवता आला नसला तरी नवख्या तिलक वर्माची निवड करण्याचे बीसीसीआयने टाळले. तसेच प्रसिध कृष्णाला आशिया कपसाठी घेतले असले तरी तो शार्दुल ठाकूरपेक्षा सरस आहे हे दाखविण्याची त्याला संधीच मिळाली नाही. परिणामतः तो संघाबाहेर गेला. पण ही संघ निवड अंतिम नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

…तर संघातून डच्चू मिळणार

वर्ल्ड कपच्या 15 सदस्यीय संघात निवड झाली असली तरी आगामी आशिया चषक स्पर्धेत अपयशी कामगिरी करणाऱया खेळाडूला वर्ल्ड कप संघातून डच्चूही मिळू शकतो. आयसीसीने संघ जाहीर करण्यासाठी 5 सप्टेंबर डेडलाइन होती. त्यानुसार संघ जाहीर करण्यात आला, पण या संघात 27 सप्टेंबरपर्यंत बदल केला जाऊ शकतो. जरी रोहितने खेळाडू जखमी झाल्यावरच संघात बदल केला जाईल, असे संकेत दिले असले तरी जे फॉर्मशिवाय संघात आहेत त्यांच्यावर सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यामुळे आशिया चषकात के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव तसेच शार्दुल ठाकूरसारखे काठावर असलेले खेळाडू आपला खेळ दाखविण्यात अपयशी ठरले तर त्यांच्या जागी सध्या संघाबाहेर गेलेल्या खेळाडूंना संघात स्थान मिळविता येऊ शकते. त्यामुळे कुणाचीही निवड अंतिम आहे अशा भ्रमात राहू नये, असे संकेत मिळाले आहेत.

आमची खोलवर फलंदाजी

आम्ही निवडलेली ही सर्वोत्तम टीम आहे आणि आमची फलंदाजी ही आमची ताकद आहे. आमची फलंदाजी खोलवर आहे. आमच्याकडे फिरकीवीर आणि वेगवान गोलंदाजीचे चांगले पर्याय आहेत. तसेच हार्दिक पंडय़ा एक पूर्ण पॅकेज असल्याचे सांगून रोहित शर्माने निवडलेल्या संघाचे कौतुक केले.

राहुल संघाला संतुलित करतो

राहुलच्या समावेशामुळे टीम इंडियाला सर्वश्रेष्ठ संतुलन लाभले आहे. त्याने फिटनेसच्या सर्व चाचण्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे तो वर्ल्ड कपचा दावेदार होता. इशान किशनमुळे संघात एकाच वेळी दोन-दोन यष्टिरक्षक फलंदाज असतील आणि या दोघांची अंतिम अकरात निवडही केली जाऊ शकते, असे संकेतही निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने दिले.