शिक्षकाने केला बारावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; बदनामीच्या भीतीने केला दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न

इंग्रजीच्या शिक्षकाने वडील आणि भावाला जिवे मारण्याची धमकी देत आपल्याच विद्यार्थिनीला पळवून नेत तिच्यावर विविध राज्यांतील लाँजच्या रूमवर अत्याचार केला. अर्धा हिंदुस्थान फिरून झाल्यानंतर विषारी औषध प्राशन करून आरोपी व पीडितेने मध्य प्रदेशातील हादरा नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मागावर असलेल्या करमाड पोलिसांनी तलावात उडी मारून दोघांना सुखरूप बाहेर काढले. या प्रकरणी करमाड पोलिसांनी शिक्षक महेंद्र त्र्यंबक साठे (42) यास अटक केली. त्याला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. बैरागडे यांनी आज दिले.

करमाड परिसरातील 17 वर्षीय पीडिता 12 जून रोजी सकाळी 6.20 च्या सुमारास एमएससीआयटीच्या क्लाससाठी भावासह घराबाहेर पडली होती. मात्र ती क्लासहून घरी परतली नाही. त्यामुळे पीडीतेच्या आईने संशयावरून शिक्षक महेंद्र साठे याच्यावर संशय घेत त्याच्याविरूद्ध करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. करमाड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 5 जुलै रोजी साठेसह पीडितेला हादरा येथून ताब्यात घेतले. त्यावेळी पीडितेने जबाब दिला. त्यानुसार, पीडिता ही 12 वीचे शिक्षण घेत असून, आरोपी हा पीडितेला इंग्रजीचा विषय शिकवत होता. त्याने अचानक एकदा पीडितेला प्रपोज केले. तो वारंवार पाठलाग करून कॉल करायचा. त्यामुळे कॉलेजमध्ये दोघांचे प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आपली बदनामी झाली आहे, आपण पळून जाऊ, असे आरोपी म्हणायचा. आरोपी पीडितेला वारंवार व्हॉट्सअॅप कॉल करून त्रास देत असे. तसेच ‘तू जर मला नकार दिला, तर तुझ्या भावाला आणि वडिलांना मारून टाकीन!’ अशी धमकी द्यायचा.

11 जून रोजी आरोपीने पीडितेला अशीच धमकी देत पळून जाण्यासाठी राजी केले. त्यानंतर 12 जून रोजी आरोपीने पीडितेला एका कारमध्ये मलकापूर येथे नेले. त्यानंतर दुसऱ्या वाहनाने मध्यप्रदेशातून राजस्थानातील भिलवाड्यात नेले, तेथे आरोपीने पीडितेवर अत्याचार केले, त्यानंतर आरोपीने पीडितेला मध्य प्रदेशासह राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम अशा विविध राज्यांत नेत विविध लॉजवर तिच्यावर अत्याचार केले. 1 जुलै रोजी आरोपीने पीडितेला भोपाळ मार्गे हादरा येथील अबलीघाट येथे नेले. तेथे आरोपी ‘आरोपी खूप बदनामी झाली, आपण आत्महत्या करू’, असे म्हणाला. त्यावर पीडितेने मी आत्महत्या करणार नाही, मला आईकडे जायचे आहे, असे सांगितले.

दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

5 जुलै रोजी साठे हा पीडितेला नेमावर येथील नर्मदा नदीवर घेऊन गेला. तेथे आपण आत्महता करू असे म्हणाला. आरोपीजवळ वांग्यावर फवारणीसाठी आणलेले औषध होते. त्याचवेळी करमाड पोलीस आल्याची कुणकुण त्याला लागली. त्याने लागलीच विषारी औषध पिले आणि नदीत उडी घेतली. हे पाहून घाबरलेल्या पीडितेने देखील तसेच केले. मात्र पोलिसांनी दोघांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर उपचार करून पोलीस ठाण्यात आणले.