अंबेनळी घाटात टेम्पो 300 फूट खोल दरीत कोसळला, चालक, इंजिनीअरसह चौघे जखमी

महाबळेश्वरपासून जवळच मेटतळे गावच्या हद्दीत अंबेनळी घाटात टेस्ट ड्राइव्हसाठी निघालेल्या टाटा योद्धा मिनी टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटून सुरक्षाकठडा तोडून टेम्पो 300 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असून, चालक आणि एक इंजिनीअर सुदैवाने बचावले. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी दोघांना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी दोघे जखमी झाले. या अपघातामुळे अंबेनळी घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेनंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी धाव घेत माहिती घेतली.

टेम्पोचालक देवदत्त वाघ (रा. जळगाव; सध्या रा. पुणे), इंजिनीअर जितेंद्र खाणे (रा. पुणे) अशी जखमींची नावे आहेत. तर, बचावासाठी गेलेले सीताराम शिंगरे व सोमनाथ वागदरे हे दोन स्थानिक युवकही जखमी झाले आहेत.

पुणे येथील टाटा मोटारचे तीन योद्धा टेम्पो घाटातील टेस्ट ड्राइव्हसाठी पुणे ते पोलादपूर प्रवासाला निघाले होते. पुण्यातील कात्रज, खंडाळा येथील खंबाटकी, तर वाई येथील पसरणी घाट यशस्वी पार करून हे तीन टेम्पो महाबळेश्वरमार्गे अंबेनळी घाटातून पोलादपूरला निघाले होते. एकत्र प्रवासाला निघालेल्या प्रत्येक टेम्पोत चालक व एक इंजिनीअर होता. आज दुपारी तीन टेम्पोंपैकी एका चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो सुरक्षाकठडा तोडून 300 फूट खोल दरीत कोसळला. याची माहिती मिळताच मेटतळे गावातील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब बालचिम हे घटनास्थळी दाखल झाले.

टेम्पो दरीत कोसळत असताना इंजिनीअरने उडी मारली. त्यामुळे ते 100 फुटांवर दरीत अडकून पडले होते, तर चालक टेम्पोत अडकून पडला होता. बचावासाठी गेलेले तरुण चालकाला वाचवीत असताना टेम्पोने आणखी दोन पलटी घेतल्याने दोन तरुण जखमी झाले. त्यातूनही तरुणांनी दोघांना वाचविले. मेटतळे येथील वामन धामुणसे, ऋषी शिंगरे, बाळू शिंगरे, गौरव शिंगरे, यांच्यासह ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’चे सुनीलबाबा भाटिया, अमित काळी, सुनील केळगणे, नीलेश बावळेकर, अक्षय नाविलकर, अमित झाडे, सुमित कोळी, सुनील वाडकर, सुरेश वाशिवले, ओंकार नाविलकर, सनी बावळेकर, ‘सह्याद्री ट्रेकर्स’चे संजय पार्टे यांनी बचावकार्य केले. पोलीस निरीक्षक रौफ इनामदार, नवनाथ शिंदे, अजित पवार, ठोंबरे आदी सहभागी झाले होते.

बचावकार्याला मदत व्हावी म्हणून तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील या स्वतः तीन तास घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यांनी अपघातातील जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेची सोय केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे पोलादपूर येथील रूग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, स्थानिक महाबळेश्वर येथील एकही रुग्णवाहीका आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले नसल्यामुळे तहसीलदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.